राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब; समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:10 IST2025-02-12T08:10:40+5:302025-02-12T08:10:57+5:30

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, भिवंडीचा समावेश

Agro Logistics Hubs at four locations in the state; Projects to be set up along Samruddhi Highway | राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब; समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प

राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब; समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प

नितीन चौधरी

पुणे : शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. हे चारही हब समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या उपक्रमांतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार असून, पहिल्या हबचे भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे. 

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई व पुण्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणार आहेत. वर्धा व नागपूर येथे राष्ट्रीय तर पाच ठिकाणी प्रादेशिक व २५ जिल्ह्यांत जिल्हा लॉजिस्टिक हब उभारले जात आहेत. यातच शेती क्षेत्रालाही सामावून घेण्यात येणार आहे. त्यानुसार चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येत आहेत. शेतमालावर प्रक्रिया करून तो निर्यातक्षम तयार करण्यासाठी या हबचा वापर केला जाणार आहे.   

समृद्धी महामार्गालगत उभारणार प्रकल्प
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई वाहतूक आता जलदगतीने होऊ लागली आहे. याचाच फायदा घेत नाशवंत शेतमालाची वाहतूक वेगाने करण्यासाठी या महामार्गाचा वापर करण्यात येणार आहे. या महामार्गालगत नागपूर विभागात नागपूर, मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, पुणे विभागात तळेगाव व कोकण विभागात भिवंडी येथे आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे. 

तळेगावातून फूलनिर्यात
पणन विभागाच्या मॅग्नेट प्रकल्पात याबाबत तपासणी करण्यात येत आहे. यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच तळेगाव येथील सुमारे १०० एकर जागेची पाहणी केली आहे. फुलांच्या निर्यातीसाठी या हबचा वापर केला जाणार आहे.    

जांबरगावमध्ये पहिले हब 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे ॲग्रो लॉजिस्टिक हबचे ४५ दिवसांत उद्घाटन करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हबच्या उभारणीसाठी प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प व अध्यक्ष व्यवस्थापकीय तथा संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Agro Logistics Hubs at four locations in the state; Projects to be set up along Samruddhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.