Jitendra Awhad on Manikrao Kokate: वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नव्या वादात अडकले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात माणिकरावर कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी कृषीमंत्र्यांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी मी जंगली रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आणखी किती पुरावे हवेत ते सांगा असा सवाल केला आहे.
रविवारी रोहित पवार यांनी एक्सवर माणिकराव कोकाटे रमी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू येत नाही, अशी टीका करत कोकाटेंनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी यूट्यूब सुरु केल्यावर ती जाहिरात आली होती असं स्पष्टीकरण दिलं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकोटेंचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
"एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे. प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय!," असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
माणिकरांकडून चुकीची विधान गेली - सुनील तटकरे
"माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली आहेत. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली. पण काल जो प्रकार समोर आला त्यानंतर काय करायचं याचा निर्णय अजित पवार घेतील," असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.