कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:25 IST2025-07-23T06:24:43+5:302025-07-23T06:25:02+5:30
विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
नाशिक : विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. ‘पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही’ असे विधान त्यांनी केले. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधक पुन्हा एकदा तुटून पडले.
शेतकऱ्यांना मी यापूर्वी कधीही भिकारी म्हणालो नव्हतो. तेव्हाही माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला. शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही, असे कोकाटे म्हणाले. जिथे पीकच नाही तेथे शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? ही बाब खरीच असून ढेकळं म्हणजे काय? हे विरोधकांनी समजून घ्यावे, असेही कोकाटे म्हणाले.
दुर्दैवी वक्तव्य : फडणवीस
कोकाटे काय बोलले, हे मी पाहिले नाही; पण मंत्र्यांचे असे वक्तव्य दुर्दैवी आहे. दरवर्षी ५ हजार कोटी याप्रमाणे येत्या पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करीत आहोत. त्यामुळे मंत्री असणाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत नाराजी व्यक्त केली. कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली आहे.