‘त्या’ शेतकऱ्याला तातडीने मदत, कृषिमंत्र्यांनी दिलं आश्वासन; मनुष्यचलित सायकल उपलब्ध करून दिली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:32 IST2025-07-09T07:32:01+5:302025-07-09T07:32:44+5:30

ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. फार्मर आयडीमुळे सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने देण्यास मदत होणार आहे.

Agriculture Minister assures immediate help to 'that' farmer; Human-powered bicycle provided | ‘त्या’ शेतकऱ्याला तातडीने मदत, कृषिमंत्र्यांनी दिलं आश्वासन; मनुष्यचलित सायकल उपलब्ध करून दिली 

‘त्या’ शेतकऱ्याला तातडीने मदत, कृषिमंत्र्यांनी दिलं आश्वासन; मनुष्यचलित सायकल उपलब्ध करून दिली 

मुंबई : लातूरमध्ये बैलाऐवजी स्वतःला जोताला जुंपून घेणारे शेतकरी अंबादास गोविंद पवार हे पीएम-किसान योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांची ०.८७ तर, सौ. मुक्ताबाई पवार यांची ०.८९ कोरडवाहू शेती आहे. बाबुराव गोविंद पवार यांचा कापूस कोळपणी करतानाचा व्हिडीओ क्लिप व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना तातडीची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

विरोधी पक्षाच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री कोकाटे म्हणाले, तालुका कृषी अधिकारी (अहमदपूर), मंडळ कृषी अधिकारी (शिरूर ताजबंद), सहायक कृषी अधिकारी (हडोळती), आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी १ जुलै २०२५ रोजी अंबादास पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार १ बॅग डीएपी खत, १० किलो बायोफर्टिलायझर व तूर मिनीकिट बियाणे ४ किलो अशी तातडीची मदत दिली.

मनुष्यचलित सायकल उपलब्ध करून दिली 
२ जुलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर व तालुका कृषी अधिकारी, अहमदपूर यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार ४ जुलैला मनुष्यचलित सायकल उपलब्ध करून दिली. तसेच, त्यांना बैलाच्या मदतीने कोळपणी करून देण्यात येणार आहे. ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. फार्मर आयडीमुळे सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुलभतेने देण्यास मदत होणार आहे. या प्रणालीअंतर्गत राज्यात १,०६,७१,९०५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, पीएम किसानसह सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

Web Title: Agriculture Minister assures immediate help to 'that' farmer; Human-powered bicycle provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी