राज्यातील कृषी विद्यापीठांना मिळणार स्वतंत्र हवामान संशोधन केंद्रे
By Admin | Updated: January 1, 2017 02:16 IST2017-01-01T02:05:00+5:302017-01-01T02:16:54+5:30
कुलगुरूचा पाठपुरावा; कृषी मंत्र्यांची अनुकूलता

राज्यातील कृषी विद्यापीठांना मिळणार स्वतंत्र हवामान संशोधन केंद्रे
राजरत्न सिरसाट
अकोला,दि. ३१- हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा हवामानविषयक अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता राज्यातील कृषी विद्यापीठांनी स्वतंत्र हवामान अभ्यास संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. या प्रस्तावाला कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अनुकूलता दर्शविली आहे. ही केंद्रे निर्माण झाल्यास शेतकर्यांना हवामानाचा अचूक सल्ला देणे सोयीचे होणार आहे.
आपल्या राज्याचा हवामानविषयक अभ्यास आपल्याकडे असावा याकरिता सर्वप्रथम केरळने ह्यहवामान बदल शिक्षण आणि संशोधन अकादमीह्णची स्थापना केली आहे. त्यानंतर पंजाब कृषी विद्यापीठाने स्कूल ऑफ क्लायमेंट चेंज अँन्ड अँग्रो मेटेरॉलॉजीची स्थापना करीत या बदलाचा अभ्यास करण्यासाठी आघाडी घेतलेली आहे. वास्तविक बघता या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्य शासनाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविलेला आहे; परंतु अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव तेथे धूळ खात पडला आहे.
राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले तर राज्यातील एकाही कृषी विद्यापीठामध्ये कृषी हवामान या विषयावर पीएच.डी. अभ्यासक्रमच नाही. तेथेही या विषयात पीएच.डी. करण्यासाठी कमी जागा आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या विषयात पीएच.डी. करण्यावर र्मयादा आली आहे.
राज्यातील शेतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसात जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस अलीकडे होतानाची नोंद आहे. तापमानातही बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत असल्याने कृषी शास्त्रज्ञांना पीक, शेतीचे नियोजन करताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे; पण आता कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूं नी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आले असून, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येत्या वर्षात स्वतंत्र हवामान केंद्र निकाली काढण्याचे आश्वासन अकोल्यात कृषी विद्यापाठाच्या कुलगुरूंना दिले आहे. यामुळे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेष म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकटराव एम. मायंदे यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर विद्यमान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेस्वरलू यांनीही याबाबत शासनाकडे मागणी केलेली होती.
राज्यात कृषी हवामानावर पीएच.डी. नाही !
महाराष्ट्र प्रगत राज्य असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अल्प जागा सोडल्या तर एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन, अभ्यास केंद्र नाही. त्यामुळे या विषयावर या राज्यात पीएच.डी. करता येत नाही. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करायचे असेल तर कृषी विद्यापीठांतर्गत ही केंद्रे सुरू करण्याची गरज असल्याने डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी प्रस्ताव पाठविला होता.
'लोकमत'चा पाठपुरावा
राज्यातील कृषी विद्यापीठात कृषी हवामान संशोधन अभ्यास केंद्र व्हावे, याकरिता मागील सहा वर्षांपासून पाठपुरावा म्हणजेच वृत्त प्रकाशित केले आहेत, हे विशेष.
-स्वतंत्र कृषी हवामान संशोधन, अभ्यास केंद्र मिळण्यासाठी २00९ मध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेद्वारा शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करू न देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. आता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हिरवी झेंडी दिली आहे. ही केंद्रे झाल्यास कृषी हवामानासंदर्भातील महत्त्वाची समस्या सोडण्यास मदत होईल.
डॉ. व्यंकटराव मायंदे,
माजी कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
- राज्यात कृषी हवामान संशोधन केंद्र असावे, यासाठीची मागणी आम्ही शासनाकडे केली होती. आता ती निकाली निघणार असल्याने कृषी शास्त्रज्ञ, शेतकर्यांना दिलासादायक ठरणार आहे. मराठवाड्यात औरंगाबादनजीक बदनापूर येथे हे केंद्र व्हावे, यासाठीचा आमचा प्रस्ताव आहे.
डॉ. बी. व्यंकटेस्वरलू,
स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
-हवामान बदलाचे आव्हान बघता, कृषी हवामान संशोधन, शिक्षण अभ्यास केंद्र आम्हाला हवे आहे. त्यासाठीचा पाठपुरावा केला होता.
- डॉ. रविप्रकाश दाणी,
कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.