अणुऊर्जेविरोधात शिवसेनेचा पुन्हा एल्गार
By Admin | Updated: March 16, 2015 00:06 IST2015-03-15T23:32:18+5:302015-03-16T00:06:51+5:30
राजेंद्र महाडिक : रत्नागिरीत गुरूवारी मोर्चा

अणुऊर्जेविरोधात शिवसेनेचा पुन्हा एल्गार
रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दि. १९ रोजी मोर्चा काढून प्रकल्पाचे रत्नागिरीतील कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जैतापूर प्रकल्पाविरोधात दि. १९ मार्च रोजी रत्नागिरीतील या प्रकल्पाच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा उभारणार आहे. त्यासाठी रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांसह जिल्ह्याचा पाठिंबा असल्याचे यावेळी महाडिक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच हे आंदोलन होत असून, शिवसेना आजही जनतेच्या बाजूने आहे. हा मोर्चा प्रकल्पाच्या रत्नागिरी शहरातील कार्यालयावर नेला जाणार आहे. त्यावेळी कार्यालय उद्ध्वस्त करून ते कायमचे बंद करू, असाही इशारा त्यांनी दिला.आमदार राजन साळवी म्हणाले की, जैतापूर प्रकल्पासाठी ९३८ हेक्टर जमीन संपादित केली आहे. सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची प्रकल्पाबाबतची भूमिका बदललेली नाही. २००६ पासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करीत आहोत. आपण आंदोलन केले नसते तर हा प्रकल्प ५ ते ६ वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता. मात्र, शिवसेनेच्या आंदोलनामुळे या प्रकल्पाची एक भिंतही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प निघून जाईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. (शहर वार्ताहर)