कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:30 IST2023-06-22T11:29:19+5:302023-06-22T11:30:01+5:30
संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...
मार्केटयार्ड उभारण्यावरून साताऱ्यात बुधवारी भाजपाचे राज्यसभा खासदार उदयन राजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद झाला होता. दोघांचेही समर्थक समोरसमोर आले होते. दोघांनीही वेगवेगळी भूमिपूजने केली होती. आता या वादानंतर दोन्ही राजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
संभाजीनगरमधील बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सातारा शहराजवळील खिंडवाडी येथे मूळ मालक खासदार उदयनराजे भोसले आणि काही कूळांच्या ताब्यात सुमारे १६ एकर जमीन होती. ही जमीन शासनाकडून बाजारसमितीने ताब्यात घेतली आहे. त्याठिकाणी मार्केट, गुरांचा बाजार, क्लोड स्टोअरेज करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराच्या बाहेरच लोकांची घाऊक खरेदी विक्री होईल, असे बाजार समितीचे नियोजन आहे. तर याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीनगर ग्रामपंचायतीला आरोग्य आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने त्याठिकाणी पाण्याची टाकी, आरोग्यकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. यावरुन राजेंच्या दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला होता.
उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठी पाण्याची टाकी, फिल्टरेशन टँक आणि आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे पुढील काळातही हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे फडणवीस यांनी दोन्ही राजेंना बोलवून घेतले असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होती. आज सकाळीच दोन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर उदयनराजे बाहेर आले तर शिवेंद्रसिंहराजेंसोबत फडणवीस चर्चा करत होते. विकासकामांसंदर्भात दोन्ही राजांशी चर्चा केल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे.