राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:56 IST2025-01-28T16:18:08+5:302025-01-28T16:56:24+5:30
३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.

राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; ५०० शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र'
मुंबई/पुणे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पक्षांतरं वाढल्याचं दिसून येत आहे. त्यात सर्वात मोठी गळती उद्धव ठाकरे गटाला बसत आहे. ठाकरे गटाला सोडून बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असताना दुसरीकडे पुण्यातही ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, विभागाप्रमुखासह ४००-५०० शिवसैनिक शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करत आहेत.
नुकतेच खासदार संजय राऊत यांचा पुणे दौरा झाला. या दौऱ्यात मानापमान नाट्य पाहायला मिळाले. शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांकडून संघटनेचा आढावा घेण्यात आला. परंतु त्यानंतर आज ठाकरे गटाला गळती लागली आहे. आज ठाकरे गटातील ४०० ते ५०० कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार करणार आहेत. मुंबईतील बाळासाहेब भवनात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.
शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार असून आज शाखाध्यक्ष आणि विभागप्रमुखांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.
विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात संजय राऊत यांचे २ दौरे पुण्यात झाले. या दोन्ही दौऱ्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं चित्र दिसून आले. राऊतांच्या पहिल्या दौऱ्यानंतर पक्षातील ५ माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला होता. यंदाही पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक पक्ष सोडत आहेत.
दरम्यान, सोमवारी मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राजूल पटेल यांच्यासह विले पार्ले येथील शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.