पावसानंतर काढणार जलपर्णी

By Admin | Updated: July 4, 2016 01:58 IST2016-07-04T01:58:57+5:302016-07-04T01:58:57+5:30

महापालिकेकडून वेगवेगळ्या मार्गाने करदात्यांच्या पैशांची लूट सुरूच आहे.

After harvest, waterfowl will take off | पावसानंतर काढणार जलपर्णी

पावसानंतर काढणार जलपर्णी


पिंपरी : महापालिकेकडून वेगवेगळ्या मार्गाने करदात्यांच्या पैशांची लूट सुरूच आहे. धो-धो पाऊस बरसल्यानंतरही पवना नदीतील जलपर्णी काढण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात नदीपात्रातील जलपर्णी वाहून जाणार, हे माहीत असतानाही जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, तसेच मुळा नदी वाहते. या नद्यांच्या पात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना डास, चिलटे, दुर्गंधी आदींचा त्रास होतो. यासह नदीचेही विद्रूपीकरण होते. यामुळे नदी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांकडून जलपर्णी काढण्याची मागणी केली जाते. जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडूनही नियोजन केले जाते. बऱ्याचदा हे काम ठेकेदारामार्फत केले जाते. मात्र, त्यांच्याकडून वेळेत काम पूर्ण होत नाही. कामाचे बिल मात्र ठेकेदाराला अदा केले जाते, असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. दिलेल्या मुदतीत जलपर्णी काढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, ठेकेदार पावसाची वाट पाहत असतात, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, पाऊस झाल्यास पावसाच्या पाण्यात सर्व जलपर्णी वाहून जाते. त्यामुळे आयत्यारीत्या जलपर्णी गेल्यानंतर ठेकेदाराचीही चांदी होते. यातून एक प्रकारे करदात्यांच्या पैशांची लूट केली जाते.
याचप्रकारे यंदाच्या वर्षीही असाच प्रकार सुरू आहे. पावसाळा सुरू झाला असताना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची महापालिकेने सुरू केली आहे.
महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मनुष्यबळाद्वारे करण्यात
येत होते. मात्र, आवश्यक त्या वेगाने काम पूर्ण होत नसल्याने आता खासगी संस्थेकडून यंत्राच्या साहाय्याने जलपर्णी काढण्याचे नियोजन महापालिकेकडून केले
जात आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
संबंधित खासगी संस्थेस विनानिविदा थेट पद्धतीने करारनामा करून एक महिन्यापर्यंत किंवा आवश्यक कालावधीपर्यंत काम देण्यास, तसेच त्यासाठी येणाऱ्या सहा लाखांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवण्यात आला आहे. पाऊस सुरू झाल्याने पाण्याच्या वेगाने जलपर्णी वाहून जाणार, याची कल्पना असतानाही करदात्यांचे पैसे ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. हे प्रकार रोखण्यासाठी जागरुक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: After harvest, waterfowl will take off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.