Mahayuti Government: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. महायुतीचे अनेक बडी नेतेमंडळी पराभूत झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत आले. महायुतीचे २३१ उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यादरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही पुनरागमन केले. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि लाडकी बहीण योजना जाहीर केली. ही योजना मोठ्या उत्साहाने राबवली. शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपयांचे वीजबिल माफ केले. त्यानंतर शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य झाले. आम्ही लोकांना पायाभूत सुविधांचे आश्वासन दिले होते, ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला," असे विधान सुनील तटकरे यांनी केले.
आता आमचे संपूर्ण लक्ष स्थानिक निवडणुकांवर
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अभिमानाने सांगतो की, आम्ही ५९ विधानसभा जागांवर निवडणूक लढवली आणि ४१ जागांवर अभूतपूर्व यश मिळवले. सरकार स्थापन झाले आहे आणि सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. आठ-नऊ वर्षांनी नगर पंचायती आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आता आमचे संपूर्ण लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भापासून कोकणापर्यंत पूर्ण तयारी
"येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत चांद्यापासून बांद्यापर्यंत, विदर्भापासून कोकणपर्यंत, मोठ्या पक्षांमध्ये दीर्घकाळ पदे भूषवणारे अनेक अधिकारी सर्व भागांमध्ये पक्षप्रवाहात सामील होत आहेत. यातून एकता दिसून येते. दुसरीकडे, संघटना वाढवणे आणि संघटनेत शिस्त आणणे हा सर्वांचाच उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांचे मत ऐकणे हा सध्या आमचा कार्यक्रम आहे," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.