तीन वर्षानंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी
By Admin | Updated: August 28, 2016 16:53 IST2016-08-28T16:53:27+5:302016-08-28T16:53:27+5:30
शेतकऱ्यांचा आवडता सण गेल्या तीन वर्षापासून दुष्काळात साजरा होत आहे.

तीन वर्षानंतर बळीराजासाठी पोळा आनंदाची पर्वणी
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - शेतकऱ्यांचा आवडता सण गेल्या तीन वर्षापासून दुष्काळात साजरा होत आहे. मात्र यावर्षी चांगल्या पावसाने पिके बहरली असून, गेल्या तीन वर्षानंतर यावर्षीचा पोळा सण बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांठी आनंदाची पर्वणी देणारा आहे. चार दिवसांवर पोळा सण आला असल्याने येथील बाजारपेठ पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहे.
पोळासण बळीराजांसाठी आवडता सण असून येत्या चार दिवसांवर पोळासण येऊन ठेपला आहे. पोळा सणाच्या दिवशी आपल्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी येथील बाजार सजला आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती; मात्र यावर्षी चांगल्या पावसामुळे पिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे पोळा सणाच्या बाजारपेठेत तीन वर्षानंतर शेतकऱ्यांचा उत्साह दिसून येत आहे. परिणामी पोळा सणाच्या या बाजारपेठेत मोठी उलाढाल वाढेल, असा विक्रेत्यांना विश्वास आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या, ज्याच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण केली जातात अशा आपल्या लाडक्या सर्जा-राजा बैलांसाठी शेतकरी बांधवांना पोळा सणाचे वेध लागले असून, काही वर्षांपासून वरुणराजाच्या अवकृपेने या सणावर विरजन पडत आहे. परिणामी पोळा सणाबाबत असलेला उत्साह दरवर्षी कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे; यंदा मात्र जून महिन्याच्या पंधरवाड्यातच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी वेळेवर होऊ शकली. त्यामुळे पीकं सुद्धा चांगली बहरली आहेत. पीकं चांगली असल्याने शेतकऱ्यांचा पोळा सणाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे बुलडाणा येथे यावर्षीच्या पोळा सणाच्या रविवारच्या बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
पोळा सणाच्या बाजारपेठेत उलाढाल वाढणार
पोळा सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारात गर्दी झाली आहे. वाढत्या महागाईमुळे विविध वस्तूंच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पीक चांगले असल्यामुळे पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याची शेतकरी मोठ्या उत्साहात खरेदी करीत आहेत. त्यामुळे यावर्षी पोळा सणाच्या बाजारातून मोठी उलाढाला होणार असल्याचा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
बैलांच्या साजाची बाजारा गर्दी
पोळा सण आल्याने दुकाने बैलांच्या साजाने सजली आहेत. त्यात पैंजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, रेबीन, चाळ, पट्टा, कासरा, शिंग गोंडे, केसारी, मणी माळा, पितळी चैन, झुली, चंगाळे, मोरक्या, वेसनी, गुघरं, बाशिंग, कवडीमाळ, तिरंगा माळ, छमडी गोंडा आदि शोभेच्या साहित्याने बाजार सजला आहे.