अन्नधान्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम!
By Admin | Updated: September 20, 2015 22:50 IST2015-09-20T22:50:46+5:302015-09-20T22:50:46+5:30
२0१५ आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषीत; जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर कृषीविद्यापीठांचा भर.

अन्नधान्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम!
अकोला : जगातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे. त्यासाठी अन्नाविना कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. परंतु जमिनीतील प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत असून, त्याचा परिणाम थेट शेतातील पीक उत्पादनावर होत असल्याने उत्पादन घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हा धोका लक्षात घेऊन २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. जमीन व मातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याने या वर्षात शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक जण शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या मागे लागला आहे. आपण जमिनीचे शोषणच करत असल्याने जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतात पिके घेताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पिकानुसार सेंद्रिय, रासायनिक, जैविक खतांचा वापर करावा लागणार असून, पिकांची फेरपालट, हिरवळीचे खते इत्यादींचा शेतात नियमित वापर करावा लागणार आहे. या उपाययोजना केल्यास अन्नद्रव्याचा र्हास थांबवता येणार आहे. याकरिता मृद संधारणावरसुद्धा तेवढेच लक्ष द्यावे लागणार असून, लोकांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे अपरिहार्य झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर २0१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष घोषित करण्यात आले आहे. शेतकरी व समाजात शेतजमिनीबाबत साक्षरता घडवून आणण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्र संस्थेने अन्न व सुरक्षा संस्था रोम यांच्यावर सोपविली आहे. मृदा वर्ष साजरे करण्यामागे अन्नधान्य सुरक्षित व पर्यावरणाचे महत्त्व आणि जमिनीचे महत्त्व लक्षात घेऊन सरकार व कृषी संस्थांनी जनजागृती करावी, हा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरी परिसंवाद, प्रशिक्षण, कृषी मेळावे, शेतकर्यांच्या भेटी, माती परीक्षणासाठी शेतकर्यांमध्ये जनजागृती करणे, मातीच्या नमुन्याचे पृथ्थकरण करू न मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप इत्यादी कार्यक्रम हाती घेतले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत मातीच्या आरोग्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील अन्नधान्याची भूक भागवायची असेल, तर जमिनीचे आरोग्य सुदृढ ठेवावे लागणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने कार्यक्रम सुरू केले असल्याचे कृषी विद्यापीठाचे मृद व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी.बी. तामगाडगे यांनी स्पष्ट केले.