Aaditya Thackeray vs Sanjay Raut, BJP: संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवेळी राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाचा पत्ता कट केला. आता आमदार सुनील प्रभूंनी पत्राचाळ घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत मांडून राऊतांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि या घोटाळ्याची कबुलीच दिली. आदित्य ठाकरे गटाकडून आता राऊतांचा पत्ता कट करण्याचा डाव रचला जात आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. पत्राचाळ घोटाळ्याची तातडीने चौकशी करून कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
राऊतांमुळे ३५० मराठी कुटुंबे रस्त्यावर
"पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना बेघर करण्याचे पाप संजय राऊत यांचे आहे. जवळपास साडेतीनशे कुटुंबे पत्राचाळ घोटाळ्यामुळे रस्त्यावर आली आणि याला जबाबदार राऊत आहेत. विधानसभेत पत्राचाळ घोटाळा जाहीरपणे मांडून आदित्य ठाकरे गटाकडून राऊतांची कोंडी केली जात आहे. 'उबाठा' मध्ये आदित्य ठाकरे वि. संजय राऊत यांच्यातील ‘सामना’ रंगला आहे," असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.
भारताच्या प्रगतीने राऊतांना पोटदुखी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे इराण-इस्रायल युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन, गॅस टंचाईचा सामना भारत खंबीरपणे करत आहे. पुरवठा नियमित करण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे. या युद्धकाळात देखील प्रसंगाचे गांभीर्य न समजता राऊत उठसूठ पंतप्रधानांवर बालिश टीका करत आहेत. भारताची होत असलेली प्रगती पाहून राऊतांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. देशाची काळजी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. खोट्यानाट्या बातम्या पसरवून देशात इंधन असुरक्षितता निर्माण करून अराजक निर्माण करण्याच्या राहुल गांधींच्या अजेंड्याला पुढे नेण्याचे काम राऊत करत आहेत," असा हल्लाबोल बन यांनी केला.
‘उद्धव ठाकरे यांचा करुण अस्त’ अग्रलेख
"नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, मात्र उद्धव ठाकरेंना फक्त एकदाच आणि ते सुद्धा भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री होता आले. नितीश कुमार यांचा करुण अस्त नव्हे तर राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा करुण अस्त आणि उबाठा गटाची दारुण अवस्था असा अग्रलेख लिहायला हवा. काँग्रेस बरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांचा अस्त झाला हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. याउलट नितीश कुमार भाजपासोबत येऊन मुख्यमंत्री झाले. आता राज्यसभेचे खासदारदेखील होत आहेत. बिहारमध्ये जेडीयूचे सरकार भक्कम आहे, त्यांची राऊतांनी चिंता न करता आधी पायाखाली काय जळतेय ते पहावे. उद्धव ठाकरे, उबाठा गटाची अवस्था कशी दयनीय झाली आहे त्याबाबत विचार करावा", असेही बन यांनी सुनावले.
Web Summary : BJP claims Thackeray faction plots to sideline Raut amidst corruption allegations. Raut's actions reportedly caused Marathi families' displacement. BJP criticizes Raut's attacks on Modi and suggests Thackeray's alliance with Congress led to his downfall.
Web Summary : भाजपा का आरोप है कि ठाकरे गुट भ्रष्टाचार के आरोपों के बीच राउत को किनारे करने की साजिश रच रहा है। राउत की हरकतों से मराठी परिवारों का विस्थापन हुआ। भाजपा ने मोदी पर राउत के हमलों की आलोचना की और कहा कि कांग्रेस के साथ ठाकरे के गठबंधन से उनका पतन हुआ।