व्हिडीओ : आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:11 IST2019-08-29T16:09:57+5:302019-08-29T17:11:42+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

व्हिडीओ : आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यांची ही यात्रा आज विदर्भातील बाळापूरमध्ये दाखल झाली होती. यावेळी आदित्य यांच्या समोर शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून नाराजी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे यांनी शेतकरी समस्यांवर बोलताना कर्जमाफीचा उल्लेख केला. अर्थात शिवसेनेकडून याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती संबोधले जाते. आदित्य यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी हात वर करा. त्यावेळी सभेत एकच गोंधळ उडाला. सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी एका सुरात आवाज काढत कर्जमुक्ती मिळाली नसल्याचे म्हटले. त्यावर आदित्य यांनी तुम्ही कर्जमुक्तीसाठी पात्र आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वांना होकार दिला. त्यानंतर आदित्य यांनी कर्जमुक्ती संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss! pic.twitter.com/VV5cD1bxjN
— Lokmat (@MiLOKMAT) August 29, 2019
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपसोबत युती करताना आपण सरसकट कर्जमाफीची बोलणी केली होती. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली त्यांनी आपली नावे माझ्याकडे द्यावी. हाच विषय मला महाराष्ट्रभर मांडायचा असल्याचे आदित्य यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात देखील असंच झालं होतं. पीकविमा कंपन्याच पैसा कमवत होत्या. परंतु, उद्धव साहेबांनी विमा कंपन्यांवर मोर्चा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर विम्याचे ९६० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा आदित्य यांनी यावेळी केला.