‘अदाएगी कुपन’सक्ती अन्यायकारक
By Admin | Updated: June 7, 2015 02:07 IST2015-06-07T02:07:24+5:302015-06-07T02:07:24+5:30
इस्लाम धर्माचा चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे हज. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा प्रत्येक मुस्लीम आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करतो.

‘अदाएगी कुपन’सक्ती अन्यायकारक
अझहर शेख, नाशिक
इस्लाम धर्माचा चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे हज. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा प्रत्येक मुस्लीम आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करतो. हज यात्रेसंबंधी भारतीय केंद्रीय हज समितीकडून प्रत्येक हज यात्रेकरूवर कुर्बानीच्या ‘अदाएगी कुपन’ची सक्ती करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, राज्य हज समितीसह विविध धार्मिक संघटनांसह उलेमांनीही याबाबत आक्षेप घेतला आहे.
केंद्रीय समितीला धार्मिक बाबींमध्ये (शरियत) हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे मत धार्मिक स्तरावरून व्यक्त केले जात आहे. एकूणच राज्य व कें द्र सरकारच्या हज समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कुपन वाद’ सध्या गाजत आहे.
चार महिन्यांपासून केंद्रीय हज समितीकडून हज यात्रेकरूंना ‘अदाएगी कुपन’ खरेदी करणे बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारच्या माध्यमातून समिती याबाबत कायदा करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी ‘लोकमत’ला दिली. यात्रेकरूंना कुर्बानी करणे धार्मिक कायद्यानुसार ऐच्छिक आहे. यामुळे हज समितीला कुर्बानीच्या नावाखाली कुपन विक्री करणे व त्याची सक्ती यात्रेकरूंवर लादण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे धर्मगुरूंचे मत आहे. केंद्रीय हज समितीने कुपन सक्तीचा अट्टाहास न सोडल्यास धार्मिक शरियतमध्ये हा मोठा हस्तक्षेप ठरू शकतो, असे फतवे राज्यासह धार्मिक दारूलउलूम व मुफ्तींकडून प्राप्त झाल्याचे शेख यांनी सांगितले आहे.
‘तेथे’ बोगस कुपन विक्री?
मक्कामध्ये सौदी सरकारच्या कुर्बानीच्या अदाएगी कुपनची बोगस विक्री केली जात असल्याचे राज्याच्या हज समितीने केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिले. राज्य समितीच्या अध्यक्षांनी थेट तक्रार सौदी सरकारकडे करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केंद्राच्या समितीकडे केली. केंद्रीय हज समितीने सखोल चौकशी करून यात्रेकरूंना फसविणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी इब्राहिम शेख यांनी केली आहे.