अपर आदिवासी आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: July 19, 2014 02:21 IST2014-07-19T02:21:47+5:302014-07-19T02:21:47+5:30
इमारतीचे थकित भाडे मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी अपर आदिवासी आयुक्तासह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़

अपर आदिवासी आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
अमरावती : आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी दिलेल्या इमारतीचे थकित भाडे मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी अपर आदिवासी आयुक्तासह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़ भास्कर पांडुरंग वाळिंबे (५७), असे अपर आदिवासी आयुक्ताचे, तर कनिष्ठ लिपिक कालिदास चंद्रभान मेश्राम (४८) अशी लाचखोरांची नावे आहेत़
नारायण लक्ष्मण म्हात्रे (४५) यांची यवतामाळ जिल्ह्णातील दिग्रस येथे तीन मजली इमारत आहे. त्यांनी ही इमारत अपर आदिवासी आयुक्त कार्यालयाला आदिवासी मुलांचे वसतिगृह चालविण्यासाठी १ जुलै २०११ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत दरमहा ४७ हजार रुपये भाडेतत्त्वावर दिली होती. या इमारतीच्या भाड्यापोटी १५ लाख रुपये म्हात्रे यांना आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून घ्यावयाचे होते. थकीत भाडे मिळवून देण्यासाठी वाळिंबे यांनी कनिष्ठ लिपिक कालिदास मेश्राम याच्या माध्यमातून नारायण म्हात्रे यांना २५ हजार रुपयांची लाच मागितली. म्हात्रे यांनी थेट लाचलुचपत कार्यालयात याची तक्रार नोंदविली. तक्रारीनंतर शुक्रवारी सापळा रचून वाळिंबे यांना मेश्राम याच्या मध्यस्थीने म्हात्रे यांच्याकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)