मोहाची दारू समजून पिलं अॅसिड, दोघांनी गमावला जीव
By Admin | Updated: September 16, 2016 21:55 IST2016-09-16T21:55:52+5:302016-09-16T21:55:52+5:30
-भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना

मोहाची दारू समजून पिलं अॅसिड, दोघांनी गमावला जीव
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली,दि.16-भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १३ व १५ सप्टेंबर रोजी घडली. मृतकांमध्ये पुरूषासह एका महिलेचाही समावेश आहे.
१२ सप्टेंबर रोजी टेकडा गावात नवा पंडूम सण साजरा करण्यात आला. त्यानंतर १३ सप्टेंबरला कमली लालसू वड्डे (२३) व गोंगलू पुसू नरोटी (७०) या दोन्ही व्यक्तींनी मोहाची दारू समजून अॅसिड प्राशन केले. सुरूवातीला कमली वड्डे या महिलेने गोंगलू पुसू नरोटी याला तिच्या घरी दारू पिण्यासाठी बोलविले होते. सदर महिलेने घरात असलेल्या अॅसिडच्या बॉटल काढल्या व पहिले तिने स्वत: बॉटलमधील अॅसिड दारू समजून प्राशन केले. त्यानंतर त्याच बॉटलमधील अॅसिड गोंगलू पुसू नरोटी यांनाही पिण्यास दिले व दोघांनी मिळून बॉटलमधील अॅसिड पूर्णपणे संपविले. त्यानंतर थोड्याचवेळात कमली वड्डे ही मृत्यूमुखी पडली. तिला पाच महिन्याचा एक मुलगा आहे तर दुसºया व्यक्तीला विषबाधा झाली म्हणून कुटुंबियांनी लोकबिरादरी रूग्णालय हेमलकसा येथे दाखल केले. त्याच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले. मात्र १४ सप्टेंबर रोजी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमली लालसू नरोटे हिच्यावर १४ सप्टेंबरला गावातच अंत्यविधी करण्यात आला तर मृतक गोंगलू नरोटेवर शुक्रवारी अंत्यविधी करण्यात आला. एकाच गावातील दोन व्यक्तींचा असा अकाली मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे