१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:59 IST2025-07-31T12:53:10+5:302025-07-31T12:59:44+5:30

या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

Accused acquitted after 17 years, so where are the guilty?; Question mark after Malegaon blast verdict | १७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनी कोर्टाने निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जर आरोपी निर्दोष असतील तर दोषी कुठे आहेत? या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात अशा भावना व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टाने दिलेल्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर झाला. त्याचे ठिकाणही आहे. या स्फोटात लोकांचाही मृत्यू झाला. जर बॉम्बस्फोट झाला तर त्यातील आरोपी गेले कुठे या स्वाभाविक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्यांना पकडले जाणे, त्यांना शिक्षा होणे या दृष्टीने सरकार पुढे काय करणार हा प्रश्न आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासारखा अधिकारी ज्यांना २६/११ ला देशावर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले होते. त्याचे पुढे काय झाले. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे स्फोटातील आरोपींना शोधले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर हेमंत करकरे हे देशातील चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी हे प्रकरण काढले. या स्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला. सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. मग या स्फोटामागे कोण होते? एका साध्वीला अटक केली जाते. देशातील लष्कर अधिकाऱ्याला अटक केली जाते. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर, लष्करावर त्यावेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या खटल्याचा राजकीय फायदा घेण्याचं काम भाजपाने केले होते. प्रज्ञा सिंहला भोपाळसारख्या मतदारसंघात खासदार बनवले होते. जेव्हा आर.आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा दहशतवादी घटना घडली होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण होते, जे आता भाजपात आहे. त्यांनी एखाद्या घटनेत कुणालाही पकडून आणा, आपण कोर्टात उभं राहू असा संदेश द्यायचा होता का असा प्रश्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही कोर्टाने दिलेल्या निकालावर नाराज आहोत. हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावून पुराव्यासह आरोपींना अटक केली होती. आज १७ वर्षांनी कोर्ट पंचनाम्यात कमतरता असल्याचे सांगते, मात्र या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

Web Title: Accused acquitted after 17 years, so where are the guilty?; Question mark after Malegaon blast verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.