अब्दुल सत्तार,अमित देशमुख मंत्रीमंडळात
By Admin | Updated: June 2, 2014 22:42 IST2014-06-02T22:03:31+5:302014-06-02T22:42:43+5:30
काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

अब्दुल सत्तार,अमित देशमुख मंत्रीमंडळात
मराठवाड्याचा टक्का वाढला
मुंबई : काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री म्हणून तर अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात एका छोटेखानी समारंभात राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी उपस्थित होते.
अब्दुल सत्तार आणि अमित देशमुख हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. सत्तार यांनी यापूर्वी अशोक चव्हाण सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविले असून ते औरंगाबाद जिल्ातील सिल्लोडचे आमदार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे कर समर्थक मानले जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले अमित पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. ते लातूरचे आमदार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारीच होणार होता पण काँग्रेस श्रेष्ठींनी अंतिम मंजुरी न दिल्याने तो होऊ शकला नाही.
देशमुख, सत्तार यांच्या बरोबरच पुण्याचे रमेश बागवे, चिमूरचे विजय वडेीवार, मुंबईतील बाबा सिद्दीकी यांचीही नावे चर्चेत होती. दोन मंत्र्यांचा समावेश करून काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीनपैकी दोन रिक्तपदे भरली आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, अलिकडे शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आज शपथ घेतलेल्या काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांचा परिचय विधानसभेत करुन दिला.
आमच्या समावेशाने मराठवाड्याला मंत्रिमंडळात आणखी स्थान मिळाल्याचा विशेष आनंद आहे. आमच्या मंत्रिपदाचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच काँग्रेस पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी करू, अशी भावना दोन्ही मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)