Aaditya Thackeray: विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीकडून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीड, परभणी प्रकरणावरूनही विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच शेतकरी कर्जमुक्ती, जुनी पेन्शन योजना, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये यांवरूनही विरोधक सातत्याने महायुती सरकारला सवाल करत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का ? आठवा वेतन लागू करणार आहात का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच त्यांना पालकमंत्री नाही, मालकमंत्री व्हायचे आहे. दादागिरीला मुख्यमंत्री झुकत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंची टीका
लाडकी बहीण योजनेवरून विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महिना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. हे २१०० रुपये कधीपासून देणार, असा सवालही सातत्याने केला जात आहे. याबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना मोठा दावा केला आहे. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे सुरू झाले आहे का? लाडकी बहीण योजनेवर माझा अंदाज असा आहे की, अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत. किंबहुना ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, ते महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करून टाकतील, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, उदय सामंत यांच्या दाव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजपा आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार फोडायच्या विचारात आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.