परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 22:08 IST2025-06-02T22:08:06+5:302025-06-02T22:08:26+5:30

मुरुमाच्या टिप्परने घेतला अड्याळच्या तरुणाचा बळी, घटनास्थळी ग्रामस्थांचा रोष : सोमनाळा-विरली मार्गावर घडला भीषण अपघात

A tipper truck collided with a two-wheeler near Adyal in Bhandara, a youth died | परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला

परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला

अड्याळ ( जि. भंडारा)  : मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत अड्याळ येथील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मित्राचे दोन्ही पाय निकामी झाले. शुभम चंद्रशेखर हटवार रा. मंढईपेठ असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वेदांत राजू करंजेकर रा. मंढईपेठ अड्याळ असे आहे. त्याच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना सोमवार २ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा-विरली खंदार मार्गावर घडला. शुभम आणि वेदांत हे दोघेही लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे परीक्षेचा पेपर द्यायला गेले होते. परीक्षा आटोपून दुचाकीने अड्याळ परत येत होते. दरम्यान अड्याळहून ४ किमी अंतरावरील सोमनाळा-विरली खंदार मार्गावर मुरूमाची अवैध वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक एमएच ३६ एए ३८७६ येत होता. या टिप्परने शुभमच्या दुचाकीला समोरा समोर घडक दिली. या घटनेत दुचाकीसह शुभम व वेदांत टिप्परमध्ये सापडले. यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर वेदांतचे दोन्ही पाय निकामी झाले. जखमी झालेल्या वेदांतला प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी जमाव
अपघात झाल्यानंतर टिप्परचालक तिथून पसार झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर टिप्परही रस्त्याच्या खाली उतरला. अपघाताची माहिती मिळताच अड्याळ येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठले. तसेच विविध मागण्यांची जोपर्यंत पुर्तता होत नाही तोपर्यंत मृतदेह बाहेर काढणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी घटनास्थळी वातावरण तापले होते.

मुरूमाची अवैध वाहतूक
विरली खंदार परिसरातून मोठ्या प्रमाणात अड्याळ मार्गावर मुरूमाची अवैध वाहतूक होत असते. यापुर्वीही तीन अपघात घडले असून यात तिघांचा मृत्यू झाला. आज घडलेल्या घटनेने ग्रामस्थ अधिकच संतापले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातत्याने अपघात घडत असून मुरूमाच्या अवैध वाहतुकीला केवळ महसूल विभाग दोषी असल्याचे म्हटले.

अशा आहेत मागण्या
मृत पावलेल्या शुभमच्या कुटुंबाला ४० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेदांतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचल करून आर्थिक मदत द्यावी, घटनास्थळी टिप्पर मालकाला हजर करावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेहाची उचल करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वृत्त लिहिपर्यंत घटनास्थळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनासह पोलिसांचा फौजफाटा तिथेच होता.

...अन् कुटुंबियाने फोडला हंबरडा
शुभम हा आई-वडिलांना एकूलता आहे. अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हटवार कुटुंबियावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शुभमचे कुटुंब पोहोचताच त्याचे कलेवर पाहून कुटुंबियाने हंबरडा फोडला.

Web Title: A tipper truck collided with a two-wheeler near Adyal in Bhandara, a youth died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात