सांगोला - सध्या सोशल मीडियावर सांगोल्याच्या खडतरे गल्लीत अवकाशातून एक पॅराशूट कोसळल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. बरेच जण यावर व्हिडिओ बनवत आहेत. अवकाशातून कोसळलेल्या या वस्तूमुळे तिथल्या वाहनांचे नुकसान झाले पण सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झाली नाही. मात्र ही वस्तू कोणती हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला तर मग जाणून घेऊया.
हैदराबाद येथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी अवकाशात सोडण्यात आलेले सुमारे दीड टन वजन असलेले टेलिस्कोपसह पॅराशूट खराब हवामानामुळे भरकटून सांगोला खडतरे गल्लीत तर पॅराशूट खारवटवाडी येथे कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली असली तरी ३ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. हा प्रकार कळताच आसपासच्या लोकांनी पॅराशूट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दिशा बदलली, पॅराशूट भरकटले
अवकाशातील तारकांचा अभ्यास व संशोधनासाठी आतापर्यंत सुमारे ५२६ बलून अवकाशात सोडले आहेत. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास हैदराबाद येथून टेलिस्कोप व बलून अवकाशात सोडला होता. हैदराबाद येथील संस्थेतून जीपीएस यंत्रणेमार्फत तो कोठे आहे हे समजते. सुरुवातीला हा बलून हैदराबादपासून ४०० किमी अंतरावर सांगली जिल्ह्यात गेला. तिथलं हवामान व्यवस्थित नसल्याने शास्त्रज्ञांनी त्याची दिशा बदलून सांगोला परिसरात वळवल्याने तो सांगोला शहरात पडला.
हैदराबाद पॅराशूट आंध्रप्रदेश ओलांडून सांगोला शहरात आले
टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबई शाखा हैदराबाद येथून दीड टन वजनाचा एक टेलिस्कोप यंत्रणेसह अर्धा टन वजनाचे २ पॅराशूट खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शनिवारी रात्री ९ वाजता अवकाशात सोडले होते. ही यंत्रणा जवळपास ३२ किमी उंचीवरून ग्रह, तारांचे निरीक्षणे नोंदवत होती. रात्री उशिरा ही निरीक्षणे नोंदवण्याचे काम संपल्यानंतर सूर्योदय पूर्वी ही यंत्रणा हैदराबाद परिसरातच उतरणे अपेक्षित होते. मात्र हवेच्या प्रेशरमुळे आंध्र प्रदेश ओलांडून सांगोला शहरात कोसळल्याने शास्त्रज्ञही चक्रावले. यातील पहिले पॅराशूट हे शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या खारटवाडी येथे कोसळले ही माहिती माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे यांनी पोलिसांना कळवली.