वेदनेचेही गाणे करणारे व्यक्तिमत्त्व, प्रा. प्रवीण दवणे यांची आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:45 IST2026-04-13T08:39:27+5:302026-04-13T08:45:03+5:30
Asha Bhosle: ज्यांच्या खळखळत्या लोभस हास्याला निर्मळ आनंदाचे परिमाण दिले, त्या जीवनचिंतक आशाताई मला कधी गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या, कधी प्रत्यक्ष भेटीच्या, कधी त्यांची जाहीर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटत गेल्या, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहिली.

वेदनेचेही गाणे करणारे व्यक्तिमत्त्व, प्रा. प्रवीण दवणे यांची आदरांजली
ठाणे - आशा भोसले नावाचा स्वरांचा अथांग गाण्याचा समुद्र! देहसीमेपलीकडे गेलेल्या असीम आशा भोसले यांच्याबद्दल मी काय नि किती बोलणार! आणि आजच्या या चिरविरह कातरक्षणी बोलणेही अवघड. जीवनानेच ज्यांचे जगणे सघन केले, ज्यांच्या खळखळत्या लोभस हास्याला निर्मळ आनंदाचे परिमाण दिले, त्या जीवनचिंतक आशाताई मला कधी गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या, कधी प्रत्यक्ष भेटीच्या, कधी त्यांची जाहीर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटत गेल्या, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहिली.
पुढे ते म्हणाले, सुरांइतकीच त्यांना साथ दिली ती अनपेक्षित दुःखांनी! अपेक्षाभंगांनी! तरीही त्या इतक्या चैतन्यांनी रसरसलेल्या कशा? मला कुतूहल होते. मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या घरी गेलो होतो. ‘प्रभुकुंज’मधील बैठक खोलीत पाहिले, दुथडी भरून वाहणारा नदीचा हिमशुभ्र फेसाळणारा वॉलपेपर पाहून ताजातवाना झालो. आशाताईंना विचारले, ‘अगदी खरीखुरी नदी वाटते; इतकी आवडते नदी?’ त्या चटकन म्हणाल्या, ‘हो, मला कंटाळा आला की मी या नदीकिनारी बसते. पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागते. कारण, नदी नेहमी कचरा किनाऱ्यावर फेकून, स्वच्छ वर्तमानात जगते! मी या नदीकडूनच आयुष्य शिकले.’
समर्पण, काव्य नि परिपूर्णता
गायनातील समर्पण, काव्य, सूर नि परिपूर्णता यांबद्दल आग्रही आशाताई अनुभवल्या. संगीतकार प्रभाकर जोग यांनी आशाताईंच्या स्वरात मी लिहिलेले, ‘मैफलीला हा घ्या मुजरा’ हे मुजरागीत, तर संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी लिहून घेतलेले, ‘साद घालते तुला!’ हे प्रीतिपर भावगीत व संगीतकार अनिल मोहिले यांनी महेश कोठारे यांच्या ‘जिवलगा’ साठी सर्वच गाणी आशाताईंच्या स्वरात ध्वनिमुद्रित केली. ‘जिवलगा’साठी नवीन नायिका असेल, हे समजताच त्या नव्या मुलीला बोलावून गप्पा केल्या. ‘जिवलगाsss’ अशी साद घालताना तिचे ओठ कसे व किती उघडतील याचा विचार केला. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही इतके अचूक असणे, हेच त्यांच्या थोरवीचे गमक मला उलगडत होते, अशी आठवण दवणे यांनी सांगितली.