मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा काढला, ओबीसींवर अन्याय नाही- मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:46 IST2025-09-03T13:45:45+5:302025-09-03T13:46:19+5:30
मला कितीही शिव्या दिल्या, तरी सामाजिक वीण घट्ट ठेवू- देवेंद्र फडणवीस

मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा काढला, ओबीसींवर अन्याय नाही- मुख्यमंत्री फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ उपसमितीने काढलेला तोडगा सखोल अभ्यासातून समोर आला आहे. न्यायालयात टिकेल व मराठा समाजाला फायदा करून देईल असा तोडगा आम्ही काढला आहे. मराठा समाजाला जे काही देता येईल ते सर्व देण्याचे आम्ही प्रयत्न केले व यापुढेही आमचा यावरच भर असेल. विशेष म्हणजे, यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर कुठलीही गदा येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनची तयारी होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची सरसकटची मागणी पूर्ण करण्यात कायदेशीर अडचणी होत्या. आरक्षण हे समुहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. त्या व्यक्तीने त्यावर दावा करायचा असतो. जरांगे यांच्या शिष्टमंडळाने ही बाब समजून घेतली व कोंडी दूर झाली.
मंत्रिमंडळ उपसमितीने सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मार्ग काढला आहे. यामुळे मराठवाड्यात मराठा समाजाचा फायदा होणार आहे. ज्या लोकांचा कधीही एकदा तरी कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल त्यांना तसे प्रमाणपत्र देता येईल. हैदराबाद गॅझेटिअरमुळे अशा नोंदी शोधणे सोपे होणार आहे. त्यातून ‘फॅमिली ट्री’ स्थापित करून आरक्षण देता येईल. ज्यांच्याबाबत असा पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाने आंदोलन मागे घ्यावे
मराठा समाजातील सरसकट सर्व आरक्षण घेतील व इतर समाजातील लोकदेखील त्यात घुसतील अशी ओबीसी समाजात भीती होती. मात्र आता असे काहीही होणार नाही. आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठलीही गदा आलेली नाही. त्यांनी सर्व आंदोलने परत घेतली पाहिजे. आमचे सरकार आहे तोपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी या दोन समाजांना तेढ निर्माण करण्याचे काम होणार नाही. महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट ठेवणे महत्त्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
मुंबईकरांची दिलगिरी
मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्यासाठी मी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त करतो. आंदोलनामुळे पोलिस व बीएमसी प्रशासनावर ताण पडला होता. तसेच उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सरकारला सूचना केल्या होत्या. त्यांचे तंतोतंत पालन करण्यावर आमचा भर असेल. मंत्रिमंडळ उपसमितीने खूप चांगले काम केले आहे. ही समिती पुढेदेखील समाजासाठी काम करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राजकारणात कधी शिव्या तर कधी फुलांचे हार
माझ्यावर टीका झाली तेव्हा मी विचलीत झालो नाही. मराठा समाजाला न्याय देणे हेच माझे ध्येय होते. तो न्याय देत असताना दोन समाजात तेढ व अन्यायाची भावना निर्माण होणार नाही हे माझ्या डोक्यात होते. मला शिवीगाळ केली तरी मी सर्वच समाजांसाठी काम करत राहीन. ते माझे कर्तव्यच आहे. काम करत असताना कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हारदेखील मिळतात, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.