कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळेंचं स्मारक उभारणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Updated: March 29, 2025 13:55 IST2025-03-29T13:54:00+5:302025-03-29T13:55:18+5:30
Tukaram Omble Memorial: २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या वेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळेंचं स्मारक उभारणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या वेळी पराक्रमाची शर्थ करत दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्यावतीने तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात एक भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
२००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यावेळी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णाल, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला होता. दरम्यान, कामा रुग्णालयात हल्ला केल्यानंतर पुढे जात असलेल्या अजमल कसाब आणि त्याच्या एका सहकाऱ्यावा मुंबई पोलिसांनी वाटेत रोखले होते. त्याचवेळी कसाब याला जिवंत पकडत असताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. हा हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी केवळ अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्याला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.