उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:34 IST2025-11-08T13:32:28+5:302025-11-08T13:34:16+5:30
Uddhav Thackeray News: कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका. त्यांनी नोटबंदी केली, तुम्ही व्होटबंदी करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले.

उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
Uddhav Thackeray News: कर्जमाफ करतो म्हणून सरकराने सांगितली, पण कर्जमाफी दिली नाही. काय करावे आणि काय नाही, अशी आमची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना काही देत नाहीत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देत आहात. दिवाळीच्या आधी आम्हाला मदत देतो, असे सांगितले होते. परंतु, अद्यापही मदत दिलेली नाही. तुमच्या तुटक्या-फुटक्या पैशांनी आमची कामे होत नाहीत. पेरणीची वेळ निघून गेली, आम्ही आता काय करायचे, अशी व्यथा एका ९० वर्षीय शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंसमोर मांडली. उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
तुम्ही सर्व शेतकरी आहात ना? माझ्यासारखे शहरीबाबू नाहीत ना? मी खरे सांगतो की, मला शेतीमधील काहीच कळत नाही. आता कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार? जमीन खरडून गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. सर्व बोगस कार्यभार आहे. मतचोरीशिवाय सरकारला दुसरा कोणताच पर्याय नाही. वेळ आली तर धोंडे मारा, असे मी असे म्हणणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका
केंद्रीय पथक तुमच्या दारात आले की, नाही? परदेशी समिती आली की नाही? मग जुलैपासून परदेशी झोपले का? केंद्रीय पथक आता येऊन गेले. केंद्रीय समिती तुमच्याकडे येणार नाही. पंतप्रधान मोदी हे बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे न मागता महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार रुपये टाकत आहेत. मराठवाड्यातला शेतकरी मेटाकोटीला आले असताना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याकडे फिरकलेच नाहीत. प्रचार करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. या सरकारला जागा दाखवली पाहिजे, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करू नका. नोटबंदी केली, तशी व्होटबंदी करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी मदत मागितली. कर्जमाफी मागितली की, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची. कुठेतरी शेतकऱ्यांनी आपले हातपाय हलवले पाहिजेत. तुम्ही आणि तुमच्या मुलाने असे काय कोट्यावधी रुपयाची पुण्यामध्ये जमीन लाटण्याचे काम तुम्ही केले आहे. एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी मदत मागतोय पण त्याला मदत दिली जात नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.