युद्धाच्या झळांनी निर्यातीचा मसाला भाजला; उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात
By अविनाश कोळी | Updated: March 24, 2026 18:24 IST2026-03-24T18:23:51+5:302026-03-24T18:24:29+5:30
आखाती देशातील निर्यात ९० टक्के ठप्प, वर्षाअखेरीस आलेख घटला

संग्रहित छाया
अविनाश कोळी
सांगली : इराण युद्धाच्या झळांनी अनेक क्षेत्रांना कवेत घेतले असतानाच जगातील सर्वांत मोठा मसाला निर्यातदार देश असलेल्या भारतातील उत्पादक, निर्यातदार चिंतित आहेत. आखाती देशांसह अमेरिकेतील मसाल्यांची ९० टक्के निर्यात ठप्प झाल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. त्यामुळे उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात सापडले आहेत. युद्ध थांबण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय आता त्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही.
स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात १७ लाख ९९ हजार २६७ टन मसाल्यांची निर्यात झाली होती. यात सर्वाधिक मिरची, आले व हळदीची निर्यात होती. २०२५-२६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाच मसाल्यांच्या निर्यातीचा आलेख झपाट्याने खाली आला. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातही निराशाजनक आकडेवारीने होणार आहे.
भारत प्रामुख्याने मिरची, जिरे, मसाला तेल, कढीपत्ता, मिरपूड, कोथिंबीर, बडिशेप, लसूण, पुदिना, मेथी दाणे, ओवा आणि जायफळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर करतो. भारताची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, चीन, यूएई, यूके, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांना होत असते. अमेरिका, आखाती देश, चीन येथे सर्वाधिक निर्यात होते. यातील अमेरिका व आखाती देशातील निर्यातच ठप्प झाली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खर्चाचा भार निर्यातदारांना असह्य झाला आहे.
टर्मरिक सिटीतही चिंता
गतवर्षी भारतातून १ लाख ७६ हजार ३२५ टन हळदीची निर्यात झाली होती. यंदा त्यात मोठी घट दिसत आहे. टर्मरिक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतही हळदीच्या निर्यातीविषयी चिंता निर्माण झाली आहे. दरवर्षी येथून मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होते.
मसाल्याच्या पदार्थांसह केळी, द्राक्ष यांची निर्यात पूर्ण ठप्प झाली आहे. कोरोना काळातही निर्यात सुरू राहिली होती. मात्र, गेल्या काही वर्षांतील निर्यातीचे हे सर्वांत मोठे संकट आहे. - तुकाराम कोरडे, निर्यातदार, पुणे.
दरवर्षी आखातात मोठ्या प्रमाणावर मसाल्यांची निर्यात होत असते. मात्र, यंदा युद्धामुळे जवळपास सर्व निर्यात ठप्प आहे. उत्पादक व निर्यातदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. युद्ध समाप्तीच्या प्रतीक्षेशिवाय काहीही हाती नाही. - दीप संघवी, निर्यातदार, अहमदाबाद (गुजरात)