८४ वर्षांची ‘तरुण’ आजी कसते शेती; कमावते लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:51 IST2022-04-05T09:49:30+5:302022-04-05T09:51:43+5:30

Agriculture: मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे.

84-year-old 'young' grandmother how to farm; Earns millions of rupees | ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी कसते शेती; कमावते लाखो रुपये

८४ वर्षांची ‘तरुण’ आजी कसते शेती; कमावते लाखो रुपये

- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून लाखोंचे उत्पन्न घेतात.
तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरात मुले व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या आजी राहतात.

मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे १९७२ ला आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच एकर शेती हिश्श्याला आली. मुले लहान होती, पण बिकट परिस्थितीतही त्यांनी मुलांना सोबत घेऊन कष्ट उपसले. ५ एकरांची शेती आता ३० एकरवर गेली आहे. त्या स्वतः या शेतीत आजही राबतात. 
आजी सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिके घ्यायच्या. सद्य:स्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकवितात. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही, अशा जमिनीत आजींनी केळीचे विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी २००२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणशक्ती तीक्ष्ण आहे. त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा त्या कुठल्याही आजाराने ग्रस्त नाहीत. 

मेहनतीने कमाविले तर...
मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागसुद्धा लागत नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. आजींचे जीवन अत्यंत संघर्षमय गेले. आयुष्यात भरपूर संकटे आली. आजींनी त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर शेती करणाऱ्या आजी तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

पतीच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर शेतीत स्वतःला झोकून दिले. तेव्हा ५ एकर शेती होती, आता ३० एकर आहे. मजुरांकडून काम करून घेत असताना स्वतःही त्यांच्याबरोबर काम करते. एकरी १५ क्विंटल उत्पन्न आजही घेते.
- मनकर्णाबाई डोईफोडे, 
शेतकरी, गोरेगाव

Web Title: 84-year-old 'young' grandmother how to farm; Earns millions of rupees