नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:18 IST2025-06-14T09:15:54+5:302025-06-14T09:18:43+5:30

Helicopter Manufacturing Project: नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.

8 thousand crore helicopter manufacturing project in Nagpur | नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार

नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार

मुंबई - नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून, त्याचे प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येईल.

प्रकल्प महाराष्ट्रातच
फडणवीस म्हणाले की, मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत.
 मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.  मलकानी यांनी प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले.
मी मूळचा महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्रातच उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी मॅक्स एरोस्पेचे अध्यक्ष भरत मलकानी, व्यवसाय विकासच्या प्रमुख मेघना मलकानी, मुख्य आर्थिक अधिकारी किरीट मेहता, अध्यक्ष जयेश मेहता, सल्लागार नीरज बेहेरे, सल्लागार देवदत्त वानरे आदी उपस्थित होते.

Web Title: 8 thousand crore helicopter manufacturing project in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.