हक्कभंग नोटीस घेऊन सुषमा अंधारेंच्या घरी पोहोचले ८ पोलिस; आमदार अनिल परब संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:46 IST2025-07-12T08:45:34+5:302025-07-12T08:46:11+5:30
सुषमा अंधारे यांच्यावरील ‘हक्कभंग’वरून आ. अनिल परब यांचा आरोप

हक्कभंग नोटीस घेऊन सुषमा अंधारेंच्या घरी पोहोचले ८ पोलिस; आमदार अनिल परब संतापले
मुंबई - उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने नोटीस पाठविली. मात्र, ती देण्यासाठी अंधारेंच्या घरी ८ पोलिस गेले, यावरून उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत संताप व्यक्त केला. अंधारे यांना घाबरविण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी पोलिसांचा वापर केल्याचा आरोप आ. परब यांनी केला.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर आ. परब यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव सभागृहात आला. तो मंजूर होऊन हक्कभंग समिती प्रमुखांकडे गेला. हक्कभंग मान्य होऊन नोटीस काढली. मात्र, पोस्टाने किंवा विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नोटीस न पाठवता क्राइम ब्रँचच्या ८ पोलिसांना पाठविण्यात आले. पोलिसांना काही काम उरले नाही का? कित्येक आरोपी मोकाट सुटले आहेत, त्यांना पकडायचे सोडून पोलिस नोटीस घेऊन गेले. हे काय चालले आहे, अशी टीका आ. परब यांनी केली.
नोटीस प्रोसिजरनुसारच पाठविल्याचा दावा
हक्कभंग समितीचे प्रमुख आ. प्रसाद लाड उत्तर देताना म्हणाले की, समितीच्या बैठकीमध्ये नोटीस पाठवण्याचे निश्चित झाले. नोटीस पाठवल्यानंतर अंधारे यांच्या पत्त्यावर कोणी राहत नसल्याचे उत्तर आले. समितीच्या दुसऱ्या प्रोसिजरनुसार जिल्ह्यातील एसपी किंवा शहराच्या पोलिस आयुक्तांमार्फत नोटीस पोहोचविली जाते. कुणाल कामराला नोटीस पाठविली; पण त्यांचा पत्ता समितीकडे नसल्यामुळे ती नोटीसही आयुक्तांमार्फत पाठविली. त्यामुळे नोटीस प्रोसिजरनुसार पाठविली आहे
तो अपमान परब विसरले का? पुळका कशासाठी?
आ. परब यांना आता सुषमा अंधारे यांचा पुळका आला आहे. मात्र, त्याच अंधारेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपमान केला होता. हा अपमान परब विसरले का? असा टोलाही आ. लाड यांनी लगावला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते सभागृहात नाही, असे स्पष्ट करून हा मुद्दा निकाली काढला.