राज्यात ११ महिन्यांत ७६६ एसीबी ट्रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 19:06 IST2018-11-18T19:05:50+5:302018-11-18T19:06:11+5:30
अपसंपदाचे १९ प्रकरणे : लाचखोरांच्या प्रमाणात वाढ

राज्यात ११ महिन्यांत ७६६ एसीबी ट्रॅप
- संदीप मानकर
अमरावती : राज्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, ११ महिन्यांत एसीबीने राज्यात तब्बल ७६६ ट्रॅप यशस्वी केलेत. यामध्ये अपसंपदाची १९ प्रकरणे समाविष्ट असून, अन्य भ्रष्टाचाराचा २३ प्रकरणांचा समावेश आहे. एकूण ८०८ प्रकरणांची या वर्षात आतापर्यंत नोंद झाली आहे.
१ जानेवारी ते १६ नोव्हेंबर दरम्यान हे ट्रॅप रचण्यात आले आहेत. नेहमीपमाणे लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. या विभागात १८९ ट्रॅप झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असून, या विभागात १६२ सापळे यशस्वी झाले आहेत. पंचायत समिती ७८, वीज कंपनी ४३, महानगरपालिका ४१, जिल्हा परिषद २७, शिक्षण विभाग २६, वनविभाग २३ आरोग्य विभाग १९ यांसह अनेक विभागांचा लाचखोरीत समावेश आहे. यंदा ट्रॅप वाढल्याने लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रत्येक विभागात एसीबीच्या एसपींची लाच घेणाऱ्यावर करडी नजर आहे.
प्रथमश्रेणीतील ६५ अधिकारी अडकले
लाच घेण्यात प्रथमश्रेणीच्या ६५ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. राज्यात ६५ अधिकारी लाच घेताना पकडण्यात आले आहेत. द्वितीय श्रेणीतील ७७, तर तृतीयश्रेणीतील सर्वाधिक ६३१ कर्मचाऱ्यांवर एसीबीचा सापळा यशस्वी ठरला असून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. काही प्रकरणांतील खटले सुरूच आहे. सर्व सापळ्यांमध्ये १ कोटी ४७ लक्ष ३ हजार ३२८ रुपयांचे रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.