४८ तास कडाक्याच्या थंडीचे!
By Admin | Updated: December 30, 2014 01:01 IST2014-12-30T01:01:39+5:302014-12-30T01:01:39+5:30
शनिवार, रविवार उपराजधानीला अक्षरश: हुडहुडी आणणाऱ्या पाऱ्याने सोमवारी किमान तापमानाचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडीत काढले. सरासरीहून चक्क ७ अंश कमी तापमान अनुभवलेल्या नागपूरसाठी पु

४८ तास कडाक्याच्या थंडीचे!
उपराजधानीला हुडहुडी : तापमान ५ अंशाहून खाली जाण्याची शक्यता
नागपूर : शनिवार, रविवार उपराजधानीला अक्षरश: हुडहुडी आणणाऱ्या पाऱ्याने सोमवारी किमान तापमानाचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडीत काढले. सरासरीहून चक्क ७ अंश कमी तापमान अनुभवलेल्या नागपूरसाठी पुढील ४८ तासदेखील गारठवणारेच राहणार आहेत. येत्या दोन दिवसांत किमान तापमान याहून खालच्या पातळीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ४८ वर्षांपूर्वी पडलेल्या कडाक्याच्या थंडीसारखाच अनुभव नागपूरकरांना येत असून केवळ मनुष्यच नाही तर प्राण्यांवरदेखील याचा परिणाम होत आहे. केवळ शहरातील नागरिकच नव्हे तर पाळीव प्राणीदेखील उबदार कपड्यांमध्ये दिसून आले.
रविवारी शहरात ६.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारी ६ अंशांच्या आसपास तापमान असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. परंतु उत्तर भारतातील अनेक शहरांत पारा घसरला अन् नागपुरातदेखील त्याचा परिणाम दिसून आला. सोमवारी पहाटे ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ईशान्य मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये थंडीची लाट असून बंगालच्या उपसागरातदेखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या सर्वांचा परिणाम विदर्भावर होत आहे. वातावरणात शुष्कता असल्याने पाऱ्यात घसरण कायम राहून शीतलहर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
ड्रायस्किन व दम्याचे रुग्ण वाढले
एकीकडे कडाक्याच्या थंडीने नागपूरकरांना त्रस्त केले असतानाच यातून स्किनच्या विविध आजाराचासुद्धा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये ड्रायस्किनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्वचा कोरडी पडल्याने खाजेचा त्रास वाढला आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या ड्रायस्किन व दम्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.
उपराजधानीवर धुक्याचे पांघरुण
पहाटेपासूनच उपराजधानीत कडाक्याची थंडी होती. शहरात सकाळच्या सुमारास धुक्याचे पांघरुणच पडले होते. विशेषत: पश्चिम नागपूर, सिव्हिल लाईन्स, तेलंगखेडी या परिसरात याची तीव्रता जास्त होती. अनेक रस्त्यांवर समोरून येणारे वाहनपण नीटपणे दिसत नव्हते अशी स्थिती होती.
दुपारीही कानटोप्या अन् मफलर
हिवाळ्यात एरवी सकाळी व सायंकाळनंतर नागरिक शाल, स्वेटर्स, मफलर अन् टोप्या घालून घराबाहेर निघतात. परंतु सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला. भर दुपारीदेखील अनेक जण कानटोप्या अन् मफलर घातलेले दिसून आले. बहुतांश दुचाकीस्वारांनी तर कान व चेहरा झाकलेलेच होते.