मुंबई : सायन रुग्णालयातील ४७ निवासी डॉक्टरांना स्वातंत्र्यदिनानिमित्त गोड म्हणून कँटीनवाल्याने तयार केलेल्या तिरंगी बर्फीतून विषबाधा झाली. उलट्या-जुलाब सुरू झाल्याने या डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. सर्व डॉक्टरांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर निवासी डॉक्टरांना काहीतरी गोड द्यावे, म्हणून रुग्णालयातील कँटीन मालकाने तिरंगा बर्फी बनवली होती. सकाळी ९ च्या सुमारास नाश्त्याबरोबरच बर्फी वाटली. ती खाल्ल्यावर काही निवासी डॉक्टरांना उलट्या, जुलाब सुरू झाले. आपत्कालीन विभागामध्ये तपासणी केल्यावर त्यांना दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही डॉक्टरांना लगेच त्रास सुरू झाला. संध्याकाळपर्यंत बर्फीबाधा झालेल्या निवासी डॉक्टरांची संख्या ४७ वर पोहोचली. यासंदर्भात सायन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बर्फीचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. पण निवासी डॉक्टरांनी यासंदर्भात कोणतीही तक्रार न दिल्याने तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच नसल्याचे सायन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गावित यांनी ‘लोकमत’ सांगितले.
४७ डॉक्टरांना ‘तिरंगी बर्फी’ची बाधा
By admin | Updated: August 16, 2014 03:01 IST