‘गावगणपती’ची ४५० वर्षांची अखंडित परंपरा

By Admin | Updated: September 20, 2015 23:57 IST2015-09-20T21:24:32+5:302015-09-20T23:57:18+5:30

नवसाचा दैवत कुळाचा गणपती : ओटवणेत रक्तवर्ण स्वरूपात मूर्ती; दर्शनासाठी गर्दीचा महापूर

450 years of unbroken tradition of 'Gavagapatapati' | ‘गावगणपती’ची ४५० वर्षांची अखंडित परंपरा

‘गावगणपती’ची ४५० वर्षांची अखंडित परंपरा

ओटवणे : साडेचारशे वर्षांपासूनची धार्मिक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावातील एक नवसाचे दैवत म्हणजे कुळाचा गणपती. यालाच ‘गाव गणपती’ असे म्हणतात. प्रत्येकाच्या घरी ‘श्रीं’ची मूर्ती विराजित झाली असली, तरी प्रत्येक भक्ताच्या मनोमनी या गाव गणपतीचा विसावा मात्र कायम असतो. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठी गर्दी कायमच असते. रक्तवर्ण स्वरूपाच्या असलेल्या या मूर्तीचे पावित्र्य तेवढ्याच सात्त्विकतेने जपावे लागते. या मूर्तीच्या जडणघडणीपासून ते विसर्जनापर्यंत पारंपरिक रीतिरिवाज आणि सात्त्विकतेचे अपूर्व असे दर्शन पडते. ओटवणे येथील सिद्धहस्त मूर्तिकार कै. अनंत मेस्त्री यांच्या कार्यशाळेत मूर्तिकार व कलावंत चंद्रकांत मेस्त्री हे ही मूर्ती घडवितात. ही मूर्ती घडविण्यासाठी मातीच्या गोळ्यांपाून ते नेत्र उघडण्यापर्यंत विविध धार्मिक रीतिरिवाज आहेत. चतुर्थीच्या दिवशीच म्हणजेच हरितालिकेच्या दिवसाच्या रात्री १२ नंतर या मूर्तीचे काम हाती घेतले जाते. विधीवत मातीच्या ओल्या गोळ्याची गावप्रमुख मानकरीकडून पूजा झाल्यानंतर या मातीला पाच फुटांएवढा गणपतीचा आकार देण्यात येतो. सर्व कामे हस्त कारागिरीत असावी लागतात. हा गणपती रक्तवर्ण असल्याने त्याला लाल रंगाचीच शेड वापरावी लागते. सूर्यास्तानंतर (मध्यरात्री) हाती घेतलेले हे काम पूर्ण करून सूर्योदयापूर्वी विधीवत पूजा-अर्चा, गाव गाऱ्हाणे झाल्यानंतरच या मूर्तीचे नेत्र उघडले जातात.
मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर गणपती हा रक्तवर्ण स्वरूपाचा असल्याने त्याची सोज्वळता अधिक जपावी लागते. या गाव गणपतीचे पूजन गाव पुरोहित बंड्या केळकर यांच्या हस्ते होते. त्यानंतर गावातील इतर गणपतींचे पूजन करण्याची प्रथा आजही रूढ आहे. गाव रहाटीतील अडीअडचणीनुसार या मूर्तीचे दिवस ठरविले जातात. जेणेकरून सर्वांना या मूर्तीचे दर्शन घेता यावे. मूर्तीच्या विसर्जनावेळीसद्धा पारंपरिक धार्मिकता आहे. चित्रशाळेतून गाव गणपती विराजमान करण्यासाठी आणि विसर्जनासाठी मूर्ती ने-आण करण्यासाठी पालखीतून राजेशाही पद्धतीने मिरवणूक काढली जाते.
मूर्तीचे विसर्जन राजे खेम सावंतांच्या माठ्याजवळील नदी, दाभिल नदी व तेरेखोल नदीच्या त्रिवेणी संगमावर केले जाते. जवळजवळ पाच फुटी जड मूर्ती दोन किलोमीटर अंतरावरील या संगमावर विसर्जनासाठी पालखी मिरवणुकीने ढोल-ताशाच्या गजरात नेली जाते.
मूर्ती जड आणि लांब अंतर असूनही गाडीचा वापर केला जात नाही. तसे केल्यास प्रवासात विविध अडचणी येतात, असे जाणकार लोक सांगतात.
आज प्रत्येकाच्या घरी ‘श्री’ विराजमान होतात. तरीही नवसाला पावणाऱ्या या कुळाच्या गणपतीच्या (गाव गणपतीच्या) दर्शनासाठी भाविकांची रीघ लागत आहे.
घरात मानाचा गणपती असला
तरी संस्कृतीची नाळ जोपासत
येथील ग्रामस्थ गावगणपतीलाच मोठ्या प्रमाणात आपल्या गणेशोत्सवात मान देतात. हे एकप्रकारे गावाच्या एकीचे प्रतीकच आहे. (वार्ताहर)

Web Title: 450 years of unbroken tradition of 'Gavagapatapati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.