महाराष्ट्राला देणार ४०० कोटींची मोफत वीज
By Admin | Updated: October 6, 2014 00:59 IST2014-10-06T00:59:40+5:302014-10-06T00:59:40+5:30
सन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली

महाराष्ट्राला देणार ४०० कोटींची मोफत वीज
मोदींचे आश्वासन : गोंदियातील सभेत एकहाती सत्ता देण्याचे आवाहन
गजानन चोपडे/मनोज ताजणे - गोंदिया
सन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली असती तर वर्षाकाठी महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची मोफत वीज मिळाली असती. भाजपाचे शासन केंद्रात येताच या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज दरवर्षी मोफत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित भरगच्च प्रचारसभेत ते बोलत होते.
आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यालगतची छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्ये विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडी शासनाने सबंध महाराष्ट्राला पोखरून टाकले आहे. छत्तीसगड राज्यात होत असलेला विकास पूर्ण बहुमत असल्याने शक्य होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत पूर्ण बहुमताचे शासन येणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलणे शक्य होणार नाही. राज्यात वीज, पाणी आणि रोजगार या समस्या आ वासून असताना आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात कोणत्याही समस्येचे निवारण केले नाही. परिणामी क्रमांक एक वर असलेला महाराष्ट्र आज माघारला आहे. महाराष्ट्रात विकासाची दारे पुन्हा उघडायची असेल तर एकहाती सत्ता असणे हाच एकमेव उपाय आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला असताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पाझर फुटला नाही. ६० वर्षांपासून सत्तासुख भोगणारे काँग्रेसचे नेते मला ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. हा हिशेब आपण जनतेला देणार असून जनताच आपली हायकमांड असल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन ‘दल’ असले तरी त्यांचे ‘दिल’ एकच आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे इरादे सारखेच आहेत. गेल्या ६० वर्षात त्यांनी जेवढे लुटायचे तेवढे लुटले, पण आता तुमच्या भाग्याचा फैसला करण्याची वेळ आली आहे, असे म्हणून भाजपला स्पष्ट बहुमताने निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सायंकाळी ५.१५ वाजता पंतप्रधानांचे वायुसेनेच्या विशेष विमानाने गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. तेथून थेट ते सभास्थळी पोहोचले. यावेळी संपूर्ण खचाखच भरलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील नागरिकांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी मंचावर मध्य प्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन, गोंदिया-भंडाराचे खासदार नाना पटोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.
चतुर आहेत शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदराव अत्यंत चतुर राजकारणी आहेत. महाराष्ट्राची जनता आता आपल्याला स्वीकारणार नाही, हे हेरुन स्वत: राज्यसभेत गेले आणि प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा बनवीत लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले, अशी फिरकीही मोदी यांनी आपल्या विशेष शैलीतून घेतली.
खांद्यावर बंदूक नव्हे, नांगर उचला
नक्षलग्रस्त गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी नक्षल चळवळीत दाखल न होता आपल्या देशाच्या विकास कार्यात हातभार लावायला हवा. कुठल्याही देशाचा विकास हिंसेतून होत नाही. त्यामुळे खांद्यावर बंदूकीेऐवजी नांगर उचलण्याचे आवाहन मोदी यांनी युवकांना केले.