राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:14 IST2024-02-28T19:00:58+5:302024-02-28T19:14:36+5:30
Namo Maha Rojgar Melava : राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री
Namo Maha Rojgar Melava : (Marathi News) मुंबई : बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शिर्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.
जिल्ह्यात २३ हजार रोजगार निर्माण होणार –राधाकृष्ण विखे पाटील
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.