नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडल्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत बाल्कनीतून कपडे काढायला गेला असता हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
आलम सिकंदर मुलाणी असे मृताचे नाव असून तो आपला भाऊ अर्शद सिकंदर मुलाणी (३५) याच्यासोबत नालासोपारा पूर्व येथील विंध्यवासिनी अपार्टमेंटमध्ये राहत होता. शनिवारी संध्याकाळी आलम कपडे वाळवण्यासाठी बाल्कनीत गेला असता त्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याला तात्काळ तुलिंज महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या म्हणण्यांनुसार पोलिसांनी कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाकारला. अर्शद मुलाणी याचीही पोलिसांनी चौकशी केली. आलमच्या घरच्यांनी कोणाविरुद्धही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. आलमचा मृतदेह शवविच्छेदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.