३ हजार कोटी थकीत, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे तोकडे चुकारे, सवलती मूल्याची थकबाकी दरमहा वाढते

By विलास गावंडे | Updated: January 20, 2025 08:25 IST2025-01-20T08:25:11+5:302025-01-20T08:25:32+5:30

ST Bus News: सरकारकडून एसटीला दरमहा सवलत मूल्याचा पूर्ण चुकारा होत नाही. ३६० कोटी रुपये घेणे असताना, ३०० कोटी रुपयांवर बोळवण केली जाते. मिळालेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार तेवढा केला जातो.

3 thousand crores in arrears, government is severing payments to ST employees, arrears of concessional value are increasing every month | ३ हजार कोटी थकीत, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे तोकडे चुकारे, सवलती मूल्याची थकबाकी दरमहा वाढते

३ हजार कोटी थकीत, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे तोकडे चुकारे, सवलती मूल्याची थकबाकी दरमहा वाढते

- विलास गावंडे
यवतमाळ- सरकारकडून एसटीला दरमहा सवलत मूल्याचा पूर्ण चुकारा होत नाही. ३६० कोटी रुपये घेणे असताना, ३०० कोटी रुपयांवर बोळवण केली जाते. मिळालेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार तेवढा केला जातो. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा भरणा त्यांच्या कर्ज, पीएफ, उपदान, विमा आदी खात्यात भरल्या जात नाही. या सर्व व्यवहाराचे मिळून कर्मचाऱ्यांचे एसटीकडे तीन हजार कोटी रुपये थकीत झाले आहे. 

एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ४०० कोटी रुपये लागतात. सरकारचे ३०० कोटी आणि उत्पन्नातील १०० कोटी मिळून पगार केला जातो. कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि उपदानाचे दोन स्वतंत्र ट्रस्ट आहे. ८९ हजार कर्मचाऱ्यांच्या पीएफचे (भविष्य निर्वाह निधी) ११०० कोटी आणि उपदानाचे १००० कोटी मिळून २१०० कोटी मागील दहा महिन्यांपासून ट्रस्टकडे  भरणा केलेले नाही. शिवाय वैद्यकीय बिलाच्या रकमाही कर्मचाऱ्यांना दिल्या नाहीत.

पीएफ ॲडव्हान्सची प्रतीक्षा
अडचणीच्या वेळी कर्मचारी पीएफ ट्रस्टमधून रक्कम उचलतात. परंतु, ऑक्टोबर २०२४ पासून एकाही कर्मचाऱ्याला पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. ट्रस्टमध्ये पुरेसा निधी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना या रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.
ट्रस्टच्या बाबतीत असाच व्यवहार राहिल्यास अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  एसटीच्या पीएफ ट्रस्टमध्ये पुरेसा निधी शिल्लक नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा भरणा ट्रस्टमध्ये झाला नाही, तर जुलैनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफची रक्कम मिळण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.  

वैद्यकीय बिलेही मिळेनात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात वैद्यकीय बिलाचे एक कोटी २७ लाख रुपये थकीत आहे.
फेब्रुवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांना ही रक्कम वितरीत करण्यात आलेली नाही. शिवाय भविष्य निर्वाह निधीची प्रकरणेही मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहे.  

एसटी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा : श्रीरंग बरगे
कोल्हापूर : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत नव्याने भरती केलेले ११७ तात्पुरते कर्मचारी, तात्पुरते घेतलेले ३० सेवानिवृत्त कर्मचारी आणि २६७ कायम कर्मचाऱ्यांना दिलेला प्रोत्साहन भत्ता आणि बोनसची रक्कम त्यांच्याकडून परत घेतली असून, नवीन कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. बँकेतील काही बचत खात्यांतून झालेल्या संशयित व्यवहारांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी  केली.

Web Title: 3 thousand crores in arrears, government is severing payments to ST employees, arrears of concessional value are increasing every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.