"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:41 IST2025-03-27T19:40:57+5:302025-03-27T19:41:27+5:30
ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे

"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी - तालुक्यातील नाखरे येथे बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २९ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रवदन शिंदे दसूरकर असं या तरूणाचं नाव असून तो नाखरे इथला रहिवासी होता. तो घरी जात असताना घरापासून एक किलोमीटर अंतरावर ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, चंद्रवदन पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून जात होता. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची इको वाहनाशी जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळावरून त्याचे घर अवघ्या १ किलोमीटर अंतरावर होते. चंद्रवदन हा एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचा तरूण होता. त्याला ट्रेकिंगची प्रचंड आवाड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणूनही ओळखला जात होता.
चंद्रवदनने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते. १ महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनानंतर त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे.
या अपघातामुळे पावस नाखरे रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनने या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे. नाखरे गावच्या पोलीस पाटलांनी या अपघाताची माहिती चंद्रवदनच्या वडिलांना दिली. घर जवळच असल्याने ते आणि चंद्रवदनची पत्नी लगेचच घटनास्थळी पोहचले आणि त्यांना चंद्रवदनचा धक्कादायक अपघात दिसला.
जेवण वाढा, मी आलोच...
चंद्रवदन पावसहून निघाल्यानंतर त्याला वडिलांचा फोन आला. घरी कधी येतो आहेत असं त्यांनी विचारले. मी वाटेतच आहे. जेवायला वाढा, मी येतोच लगेच असं चंद्रवदन याने वडिलांना सांगितले. मात्र घराच्या १ किमी अंतरावर झालेल्या दुर्दैवी अपघातात तो निधन पावला. त्यामुळे मृत्यूआधी चंद्रवदनचं त्याच्या वडिलांशी अखेरचं फोनवर बोलणं झाले.