राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:32 IST2025-03-15T08:22:40+5:302025-03-15T10:32:54+5:30
अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक
मुंबई : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिली. अमरावती विभागामध्ये १,०६९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ९५२ शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत आ. शिवाजीराव गर्जे, आ. अमोल मिटकरी आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात २०५, अमरावती जिल्ह्यात २००, अकोला जिल्ह्यात १६८, तर वर्धा जिल्ह्यात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या २,७०६ प्रकरणांपैकी १,५६३ प्रकरणे पात्र ठरली आहेत. १,१०१ शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाद्वारे ३० हजार आणि बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमधून ७० हजार रुपये अशी १ लाखाची रक्कम दिल्याचे ते म्हणाले.
काही प्रकरणांची चौकशी प्रलंबित
आत्महत्या केलेल्या काही प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असून, छत्रपती संभाजीनगर विभाग (१६७), अमरावती विभाग (१७२), बीड जिल्हा (१४), अमरावती जिल्हा (२९), अकोला जिल्हा (३४) आणि वर्धा जिल्हा (३) यांचा यात समावेश आहे.
गेल्या वर्षात अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सर्व पात्र प्रकरणांसाठीचा निधी देण्यात आला आहे.
अमरावती विभागात ९,९६१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे आढळून आली असून, त्यातील ९,८३२ प्रकरणी मदत देण्यात आली आहे, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.