रत्नागिरी : विम्याचे पैसे मिळविण्यासाठी कोणी कलमांची संख्या अधिक दाखवली, कोणी कमी वयाच्या झाडांचाही योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न केला, काहींनी पीकच नसताना विमा काढला आणि दोन शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्यामध्ये तशी जमीन तर नाहीच; पण ज्या नावाने विमा काढला होता, ते शेतकरी अस्तित्वात नाहीत. हे सर्व धक्कादायक प्रकार घडले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. तब्बल २५६ शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस काम करून पीक विमा काढला असल्याचे कृषी खात्याने केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकले जाणार आहे.२०२५ च्या अंबिया बहार फळपीक विमा योजनेंतर्गत ही शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही रक्कम अजून अदा झालेली नाही. आलेल्या प्रस्तावांची छाननी कृषी खात्याकडून सुरू असताना हा बोगस प्रकार उघड झाला आहे. तब्बल ९४.७२ हेक्टर क्षेत्रावर असा बोगस विमा काढल्याचे निदर्शनास आले आहे.फळपीक विमा योजनेचा परतावा मिळविण्यासाठी काही बागायतदारांनी फसवणूक केली आहे, त्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर केला आहे. कृषी खात्याने बागायतदारांच्या प्रस्तावांची तपासणी केली असता, त्यांना बोगस विमा काढल्याचे आढळले आहे. जिल्ह्यातील ३६ हजार ४६६ बागायतदारांनी १८ हजार १९.३६ हेक्टर क्षेत्राचा फळपीक विमा काढला होता. त्यातील २५६ शेतकऱ्यांनी फसवणूक करत ९४.७२ हेक्टर क्षेत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विम्याचे पैसे मिळविण्यासाठी २५६ शेतकऱ्यांकडून शासनाची फसवणूक, रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:10 IST