Sanjay Raut: फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:17 IST2022-02-15T17:14:17+5:302022-02-15T17:17:09+5:30
'भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला?'

Sanjay Raut: फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी संजय राऊतांनी भाजपवर मोठा घोटाळ्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे, असेही राऊत म्हणाले. राकेश वाधवान आणि किरीट सोमय्यांचा मुलगा पार्टनर आहेत. निकॉन इन्फ्रा कोणाची आहे हे मला विचारायचे आहे? ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे, असा आरोप राऊतांनी केला.
किरीट सोमय्यांचा दलाल म्हणून उल्लेख
ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत 19 बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालानं केला आहे. कुठे आहेत 19 बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असं आव्हान राऊतांनी दिलं.माझे स्पष्ट आणि थेट आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोड्याने मारेन.
भाजपकडून आम्हाला धमक्या यायच्या
नवी दिल्लीत असताना भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार लवकरच पडणार आहे. एकतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल किंवा महाविकास आघाडीतील काही आमदार आमच्यासोबत घेऊन आमचे सरकार स्थापन केले जाईल. तुम्ही यामध्ये पडू नका. अन्यथा ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाइट आणि फिक्स करतील, अशा आशयाची धमकी दिली. मात्र, याला मी सक्त विरोध केला. त्या दिवसानंतर माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तींवर ईडीने धाडी टाकण्यास सुरुवात केली, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.