मृत्यूच्या काही तास आधी प्रतीक्षा पाटीलनं लिहिली भावनिक पोस्ट; अनेकांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:20 IST2025-03-03T12:19:55+5:302025-03-03T12:20:26+5:30

Pratiksha Samadhan Patil Post: आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २० दिवसांनंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले.

24-year-old Pratiksha Patil of Jalgaon dies of cancer | मृत्यूच्या काही तास आधी प्रतीक्षा पाटीलनं लिहिली भावनिक पोस्ट; अनेकांना अश्रू अनावर

मृत्यूच्या काही तास आधी प्रतीक्षा पाटीलनं लिहिली भावनिक पोस्ट; अनेकांना अश्रू अनावर

जिजाबराव वाघ

चाळीसगाव - 'आज माझ्याकडे काय नाहीये... गाडी आहे. बंगला, क्लास पती वन अधिकारी... मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही... त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा...तुलना करू नका...' मृत्युपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे. २८ वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची. 

२७ रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे ग. स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष. प्रतीक्षा यांचे शिक्षण एमए डी.एड होते. कुसुंबा (ता. जळगाव) येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

२० दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया...अन्

प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या २४ व्या वर्षी यावल वनविभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. तीन महिने उपचार सुरूच होते. मात्र, यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले. जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. २० दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन १० किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २० दिवसांनंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले.

आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात..."मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो; पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना...त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा... जीवन जगा..." असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मतेची उजेडवातचं मृत्यूने विझवून टाकली.

Web Title: 24-year-old Pratiksha Patil of Jalgaon dies of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.