अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 05:32 IST2025-09-24T05:31:23+5:302025-09-24T05:32:33+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री बुधवारपासून पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
मुंबई : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
राज्य सरकारने आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यापैकी १ हजार ८२९ कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री बुधवारपासून पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीत काही मंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
बचावकार्यासाठी हेलिकाॅप्टर तैनात
धाराशिव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.