२२ Green highway work progress in the country : Nitin Gadkari | देशात २२ ग्रीन महामार्गांचे काम प्रगतिपथावर : नितीन गडकरी

देशात २२ ग्रीन महामार्गांचे काम प्रगतिपथावर : नितीन गडकरी

ठळक मुद्देमराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह येत्या साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण होणार १३ ते १४ तासांमध्ये हे अंतर पार करणे शक्य

पुणे :  येत्या साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे १३ ते १४ तासांमध्ये हे अंतर पार करणे शक्य होईल. तसेच देशात २२ ग्रीन महामार्गांचे कामही प्रगतिपथावर आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ, हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे व डॉईश गेझेल शाफ्ट फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने एकदिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन एका हॉटेलमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राम मोहन मिश्रा व प्रमुख अतिथी आरजीएसटीसीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, सरसंचालक प्रशांत गिरबाने, जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्टर विभागाचे संचालक नूर नक्सबांदी आदी उपस्थित होते. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिजिटल टेक्नोलॉजीज, बिल्डिंग अँड इन्क्लुझिव्ह इकोसिस्टिम इन इंडिया अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह मोबिलिटी - द रोड अहेड या चार सत्रांचा या परिषदेत समावेश होता.
गडकरी म्हणाले, की देशात उद्योग व्यवसायवाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आहेत. त्यादृष्टीने रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योगजगताने प्रयत्न करावेत, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, जेणेकरून वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आता बांबूपासून तेल मिळत असल्याने बांबूशेतीला चालना देण्यात येणार आहे.  
गडकरी म्हणाले, की देशातील अनेक राज्यांमध्ये शहरांतील लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्या सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहेत. मात्र त्याचदरम्यान पुणे आणि मुंबईसारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा शहराच्या बाहेरदेखील उद्योगव्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: २२ Green highway work progress in the country : Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.