मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत डाळींचा २३ हजार ३४० मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील गोदामांतील २२ हजार ३३६ टन डाळीचा समावेश असून, त्याची किंमत १७९ कोटी रुपये एवढी असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. डाळींचा अवैध साठा आढळल्यास नागरिकांनी त्याची तक्रार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके राज्यात विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवित असून, मर्यादेपेक्षा जास्त साठा असलेल्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. मुंबईतील त्रिमूर्ती वेअर हाऊस, लक्ष्मी वेअर हाऊस, चामुंडा वेअर हाऊस, आर. पी. वेअर हाऊस, पर्ल वेअर हाऊस या ठिकाणी केलेल्या कारवाईत हा तूर व इतर डाळींचा साठा सापडला. राज्यात साठेबाजी करणाऱ्या चौघांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, इतरांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. साठेबाजी व कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, तसेच ‘मोक्का’ व ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात येणार आहे. राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या दोन दिवसांत डाळीचे होलसेल भाव २०० रुपयांवरून आता १६० रु पयांपर्यंत खाली आले आहेत. ते येत्या काही दिवसांत आणखी कमी होतील, असा दावा बापट यांनी केला. डाळी हमी भावाने खरेदी करण्यासंदर्भातही केंद्राशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)साठेबाजांविरुद्धची कारवाई म्हणजे फार्ससाठेबाजांविरूद्ध केलेली कारवाई केवळ एक फार्स असून, राज्य सरकारने तातडीने स्वस्त धान्य दुकानांमार्फत सर्वच डाळींची स्वस्त दरात विक्री करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
साठेबाजांकडून १७९ कोटींची डाळ जप्त
By admin | Updated: October 22, 2015 01:37 IST