राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:31 IST2025-08-24T18:29:58+5:302025-08-24T18:31:55+5:30
Ganesh Chaturthi 2025: गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
अमरावती: पगारासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करण्याची मुळीचे आवश्यकता नाही. कारण बाप्पाने शासनाला सांगितले असावे, म्हणूनच तर सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाले. कर्मचाऱ्यांना गणपतीचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी अगोदरच वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता चिंता नसावी, असाच सूर कर्मचाऱ्यांचा उमटला आहे.
राज्य शासनाने यंदापासून गणेश उत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गणपती आणि महाराष्ट्र हे समीकरण हे अख्ख्या जगाला माहिती आहे. बाप्पाच्या आगमनापासून तर विर्सजनापर्यंत १० दिवस म्हणजे महाराष्ट्रात घरा-घरात, गाव-खेड्यात नवचैत्यन्याचा महापूर ओसंडून वाहतो. अगदी घरातील स्वच्छतेपासून तर बाप्पाच्या सजावटीपर्यंत प्रत्येक जण नियोजनात तल्लीन झालेला दिसून येतो. कोकणातील चाकरमान्यांना तर घराकडे सुखरूप जाता यावे, यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रात गणपती उत्सव शेकडो वर्षांपासून आनंददायी साजरा होतो. आता तर गणपती उत्सव हा ‘राज्य उत्सव’ झालेला आहे.
१७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा गिफ्ट
राज्य शासनाच्या सेवेतील १७ लाख कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा बाप्पा पावले असे म्हणायला काही हरकत नाही. कारणसुद्धा तसेच आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने २१ ऑगस्ट २०२५ रोजी आदेश जारी करून राज्य सेवेतील कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, महामंडळे या आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात होणारे वेतन ऑगस्टमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता शासन निर्णय परिच्छेद १ (१८) मधील तरतूद शिथिल करण्यात आली आहे.
आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचना
शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील सर्व कोषागारे तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन २६ ऑगस्टपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. याकरिता महाराष्ट्र नियम १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील यापूर्वीची असलेली तरतूद तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आलेली आहे. निम शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा अगोदर वेतन मिळणार आहे.
खर्चाचा बसावा मेळ...
महाराष्ट्रात गणरायाचे आगमन म्हणजे स्वर्गसुख मानले जाते. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन हे चैतन्य निर्माण करणारे आहे. यात यंदापासून शासनानेसुद्धा गणपती उत्सवाला ‘राज्य उत्सव’ जाहीर केला आहे, तर शासनाने कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरमध्ये न देता ऑगस्टमध्येच प्रदान करण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयामुळे शासकीय कर्मचारी आणखी जोशात बाप्पाचे स्वागत करणार, हे मात्र नक्की.
राज्य शासनाने गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अगोदर वेतन देण्याचा निर्णय हा अतिशय चांगला आहे. सार्वजनिक किंवा घरगुती गणपती उत्सव हा सर्व समाजाने, एकोप्याने साजरा करावा हाच उद्देश आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसमोर येणारे आर्थिक संकट काहीसे कमी होणार आहे.
-डी.एस. पवार, महासचिव, मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना.