मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल अपेक्षित असल्याचे स्पष्ट होते.अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे एकूण ७ हजार ६६७ विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी पहिल्या विशेष फेरीअखेर महाविद्यालय बदल केला होता. त्यामुळे एकूण १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाने दिलेला पर्याय नाकारला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी आलेले प्रवेश अर्ज आणि पहिल्या विशेष फेरीतील नाखुश विद्यार्थ्यांची तुलना केल्यास सुमारे २० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख शनिवारी आहे. मंगळवारी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तरी महाविद्यालय, शाखा किंवा विषयबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८४ विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरला होता, मात्र तो कन्फर्म केला नव्हता. तर ३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कन्फर्म केले होते. ६६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला होता. तर एकूण १५ हजार ०१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज कन्फर्म केला होता.
अकरावीच्या विशेष फेरीत १५ हजार अर्ज
By admin | Updated: August 20, 2016 02:10 IST