१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 05:59 IST2025-12-19T05:58:18+5:302025-12-19T05:59:34+5:30
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत.

१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
मुंबई: राज्यात एचआयव्ही (ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस) बाधित रुग्णांच्या उपचाराबाबत चिंताजनक माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ही बाब सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली.
राज्यातील विविध शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एचआयव्ही रुग्णांना मोफत अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, तरीही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार नियमितपणे न घेता मध्येच बंद करत असल्याचे आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, उपचार अर्धवट सोडल्यास रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतातच, शिवाय विषाणू इतरांमध्ये पसरण्याचा धोका देखील वाढतो.
सामाजिक कलंक, भीती, आर्थिक अडचणी, स्थलांतर, औषधांचे दुष्परिणाम, तसेच उपचार केंद्रांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ही प्रमुख कारणे उपचार अर्धवट सोडण्यामागे आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव तसेच जनजागृतीची कमतरता यामुळेही ही समस्या अधिक तीव्र होत आहे.
आतापर्यंत चार लाख जणांवर उपचार
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २००४ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपचारातून फॉलो-अप हरवलेल्या रुग्णांची संख्या एकत्रितपणे १५,४३० आहे. महाराष्ट्रात २००४ मध्ये एआरटी सेवा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ४,१३,३९५ एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना एआरटी उपचार सुरू करण्यात आले.
देशात एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक असतानाही, महाराष्ट्र राज्यात एकूण 'ऑन-एआरटी' रुग्णांपैकी फक्त ३.७ टक्के रुग्ण फॉलो अपला हरवलेले आहेत. एकूण १५,४३० एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींपैकी २३.२६ टक्के रुग्ण हे स्थलांतरित आहेत. एचआयव्ही/एड्स हा अधिसूचित आजार नसतानाही आम्ही ९८ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांना उपचारांत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत.
'एआरटी'तील कर्मचारी साधतात संपर्क
रुग्णाने नियोजित औषध उचलण्याचा दिवस चुकवताच एआरटी केंद्रातील कर्मचारी फोनद्वारे संपर्क साधतात आणि आउटरीच वर्कर घरी भेट देऊन रुग्णाला पुन्हा उपचारात आणतात.