डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार, १५० शिवशाही एसटी ताफ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:59 IST2017-12-07T16:02:42+5:302017-12-07T19:59:46+5:30
एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शयनयान(स्लीपर) शिवशाही सज्ज...

डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार, १५० शिवशाही एसटी ताफ्यात
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत. ही शिवशाही ३० आसनी असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर ही स्लीपर शिवशाही धावणार आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५० शिवशाही मार्च अखेर रस्त्यावर उतरतील. ‘स्लीपर शिवशाही’मुळे एसटी महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
एसटी महामंडळाची वातानुकूलित आणि अत्याधुनिक ‘ड्रीम एसटी’ म्हणून शिवशाही ओळखली जाते. २ बाय १ अशी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये एकूण ३० प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत. पूर्ण वातानुकूलित या एसटीला मोबाईल चार्जिंगसह मोबाईल रॅकची सोय देण्यात आली आहे. बैठक आसनी शिवशाहीप्रमाणे सर्व सुविधा या बसमध्ये देखील असणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुरुप चादर आणि उशी महामंडळातर्फे प्रवाशांना पुरवण्यात येणार आहे.
बैठक आसनी शिवशाहीबाबत तक्रारीनंतर शिवशाहीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार चालकाला आराम करण्यासाठी विशेष सोय स्लीपर शिवशाहीत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होणार आहे. सध्या १०७ शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात धावत आहेत. यात महामंडळाच्या स्वमालकीच्या ७० आणि भाडेतत्त्वावर ३७ बसेसचा समावेश आहे.
मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर स्लीपर शिवशाही धावणार आहे. मुंबई-हैद्रराबाद, मुंबई-पणजी आणि मुंबई- नागपूर अशा संभाव्य मार्गावरुन स्लीपर एसटी धावणार आहे. पुणे येथून पुणे-सुरत, पुणे- पणजी आणि पुणे-इंदौर या संभाव्य मार्गावर ही सेवा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लांब पल्ल्यासाठी ‘स्लीपर’-
मार्च अखेर २००० शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यात स्लीपर शिवशाहीचा देखील समावेश आहे. तीन टप्प्यात स्लीपर शिवशाही दाखल होणार आहे. याबसच्या विविध चाचण्या होणार आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रवासी सेवेत त्या दाखल होतील. पहिल्या टप्प्यातंर्गत डिसेंबरअखेर स्लीपर शिवशाही महामंडळातील प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. लांब पल्ल्यांच्या अंतरावर या ‘स्लीपर शिवशाही’ चालवण्यात येणार आहे.
-रणजित सिंह देओल, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक